पाटणा – गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम बंगालचा उत्तर भाग आणि बिहारच्या त्याला लागून असलेल्या भागांमध्ये बाजारात मिठाची टंचाई होणार असल्याच्या अफवा पसरल्या आणि लोकांनी सावधानतेचा उपाय म्हणून भराभर मीठ खरेदी करायला सुरूवात केली. त्यामुळे या भागात तसेच ईशान्येकडील काही राज्यांमध्ये मिठाचे भाव अचानक वाढले. दार्जिलिंगमध्ये तर मिठाचा दर १०० रुपये किलो पर्यंत गेला.
बिहारच्या काही जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर ओरिसाच्याही काही भागामध्ये अशा अङ्गवा पसरवण्यात आल्या होत्या. सरकारने अफवा पसरवणार्यांच्या विरोधात प्रभावी कारवाई करून अनेक व्यापार्यांना आणि समाजकंटकांना अटक केली आणि २१ जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल केले. दोन दिवसांमध्ये प्रसिध्दी माध्यमांतून मिठाची टंचाई होणार नसल्याचे खुलासे करण्यात आले. त्यामुळे लोकांमधली घबराट कमी झाली.
पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा आणि पूर्वोत्तर राज्यातल्या सर्व राज्य सरकारांनी जनतेला भरपूर मीठ उपलब्ध असल्याचे खात्री दिली. त्यामुळे लोकांतली घबराट संपली आहे. लोकांनी लागेल तेवढेच मीठ खरेदी करावे आणि टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवून ज्यादा दराने मीठ खरेदी करण्याचे टाळावे असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले.