चित्राची किंमत साडे सहाशे कोटी

वॉशिंग्टन – साठच्या दशकात एका भीषण कार अपघातानंतर लगेचच घडलेल्या घडामोडी००० दाखवणार्‍या आणि अमेरिकन चित्रकार अँडी वॅरोल यांनी सन 1963 मध्ये काढलेल्या चित्राची बुधवारी तब्बल 10 कोटी 50 लाख डॉलरना (सुमारे साडेसहाशे कोटी रुपये) विक्री झाली. या चित्रकाराच्या चित्राला यापूर्वी मिळालेल्या किमतीचा विक्रम या लिलावात मोडला गेला.

सूथबी या लिलावगृहात हा लिलाव झाला. या लिलावामध्ये वॅरोल यांच्या चित्रांचेच वर्चस्व दिसून आले. वॅरोल यांच्या डेथ अ‍ॅन्ड डिझास्टर या मालिकेतील हे एक महत्त्वाचे चित्र आहे आणि या आकारातील अशा प्रकारच्या चार चित्रांपैकी शेवटचे आहे.

यापूर्वी वॅरोल यांच्या ग्रीन कार क्रॅश (ग्रीन बर्निग कार) या चित्राला सन 2007 मध्ये सात कोटी 17 लाख रुपयांची किंमत मिळाली होती. प्रसिद्ध अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचे ‘लिझ’ हे रंगीत चित्र दोन कोटी डॉलरना (125 कोटी रुपये) विकले गेले. ‘फ्लॉवर्स’ हे चित्र एक कोटी 14 लाख डॉलरना (70 कोटी रुपये) तर ‘डेथ ऑफ टरकॉइज’ हे चित्र 73 लाख डॉलरना (40 कोटी रुपये) विकले गेले.