राज्यातील नेत्यांची सुरक्षेत कपात

मुंबई – राज्यातील बर्‍याच राजकीय नेत्यांना त्यांच्या पदानुसार सुरक्षा पुरवली जाते. मात्र गेल्या काही दिवसात घेतलेल्या आढाव्यानुसार काही नेत्यांना सुरक्षेची आवश्यकता नसल्याचे लक्षात आल्यानंतर, राज्यातील सुमारे 48 नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. तर काहींची सुरक्षा कमी करण्यात आली असल्याचे दिसत आहे. राज्यातील राजकीय, तसेच महत्वाच्या व्यक्तींना स्पेशल प्रोटेक्शन युनिट अर्थात एसपीयुद्वारे पोलीस संरक्षण दिले जाते.

या दलातील पोलीस अधिकारी कर्मचारी प्रशिक्षित असतात. त्यांना वैयक्तिक सुरक्षा पुरवण्याबाबतचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. मुख्यमंत्री, गृहमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री, मंत्री, महत्त्वाचे व्यक्ती, राजकीय कुटुंबीय यांना सध्या एसपीयूचे संरक्षण आहे. राज्यातील सुरक्षा काढण्यात आलेल्या नेत्यांमध्ये विजयसिंह मोहिते पाटील, विजयकुमार गावित, कृपाशंकर सिंह, रमेश बागवे यांच्यासह आणखी काही नेत्यांचा समावेश आहे. ज्या राजकीय व्यक्तीस सुरक्षा पुरवण्यात येते, त्या व्यक्तीस खरचं सुरक्षेची गरज आहे का याची माहिती उच्च स्तरीय समिती घेत असते.

या समितीत राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त, राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, विशेष शाखेचे उपायुक्त, सर्व जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक असतात. माहितीच्या आधारे उच्च स्तरीय समितीतील अधिकारी अहवाल तयार करतात. आणि तो अहवाल आढावा समितीकडे पाठवते. या आढावा समितीत राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक आदी अधिकारी असतात.एसपीयुची सुरक्षा पुरवण्याबाबचा अंतिम निर्णय आढावा समिती घेत असते. आढावा समितीच्या शिफारसीनंतर अनेकांची सुरक्षा काढण्यात आली आहे. मात्र, काही राजकीय नेते सुरक्षा परत करायला तयार नाहीत.आपली एसपीयुची सुरक्षा व्यवस्था कायम राहावी, म्हणून ते प्रयत्न करताना दिसत आहेत.

नेत्यांना पुरवल्या जाणार्‍या सुरक्षेमध्ये एक्स, वाय, झेड, झेड प्लस या पद्धतीची सुरक्षा पुरली जाते. अशाप्रकारची सुरक्षा राज्यातील अतिमहत्वाच्या 144 जणांना देण्यात आली होती. त्यांना 911 एसपीयूचे अधिकारी सुरक्षेसाठी देण्यात आले होते. मात्र आता 48 राजकीय नेत्यांची आणि महत्वाच्या व्यक्तीची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यांना असलेले 342 सुरक्षा अधिकारी परत बोलावण्यात आले आहे.