ऑस्ट्रेलियातील बिअर बाटल्यांवर लक्ष्मी गणेशाची लेबले

मेलबर्न – ऑस्टेलियातील न्यू साऊथ वेल्स भागात असलेल्या ब्रुकवेल युनियन ब्रेवरीज या कंपनीने त्यांच्या बिअर बाटल्यांवर लक्ष्मी गणेश असलेली लेबले लावल्याने येथील भारतीय समुदायाने कडक निषेध नोंदविला असून या बाटल्या बाजारातून त्वरीत मागे घ्याव्यात व कंपनीने भारतीय समुदायाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

न्यू साऊथ वेल्स मधील इंडियन ऑस्टेलियन असोसिएशनचे अध्यक्ष यादूसिंग या संदर्भात म्हणाले की वरील कंपनीने ही आक्षेपार्ह लेबले बिअर बाटल्यांवर लावली आहेत. यात गणेशाच्या एका हातात गायीचे मुंडके असून त्यातून ज्वाला निघताना दिसत आहे. कंपनीची ही हरकत अतिशय आक्षेपार्ह आणि संतापजनक आहे व त्यामुळे ही लेबले त्वरीत काढून टाकावीत अशी आम्ही मागणी केली आहे.

कंपनीतर्फे मात्र यात भारतीय समुदायाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नसून आशिया महाद्विपाची झलक दाखविण्यासाठी ही लेबले तयार केली गेल्याचा खुलासा केला आहे. त्यातून कोणताही वाद निर्माण करण्याचा आमचा उद्देश नाही असेही कंपनीचे म्हणणे आहे. यापूर्वी २०१० सालातही ऑस्ट्रेलिया फॅशन वीक मध्ये पोहोण्याच्या पोषाखावर अशाच प्रकारे नको त्या जागी लक्ष्मी देवीचे लेबल लावले गेले होते. त्यावर वाद झाल्यानंतर संबंधित कंपनीने माफी मागून ते लेबल काढून टाकले होते.