लता दिदींच्या वादात शिवसेनेची उडी

मुंबई – भारत सरकारने दिलेला भारतरत्न किताब स्वीकारला म्हणून कोणीही कॉंग्रेसचा राजकीय दास होऊ शकत नाही, असे सडेतोड उत्तर देऊन शिवसेनेने लता मंगेशकर आणि जनार्दन चांदोरकर यांच्या वादात उडी घेतली आहे. मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेल्या जनार्दन चांदोरकर यांनी लता मंगेशकर यांच्यावर नरेंद्र मोदींना पाठींबा दिल्याबद्दल टीका केली होती आणि नरेंद्र पाठींबा देणार्‍यांचे असे किताब परत घ्यावेत, अशी मागणी केली होती. त्यांच्या या उद्गारावरून समाजाच्या सर्व वर्गात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री मनिष तिवारी यांनी जनार्दन चांदोरकर यांचे मत चुकीचे असल्याचे म्हटले आहे. चांदोरकर यांनी असे विधान करायला नको होते, कॉंग्रेस पक्ष व्यक्ती स्वातंत्र्य मान्य करतो असे ते म्हणाले.

दरम्यान, जनार्दन चांदोरकर यांनी सारवासारवी सुरू केली आहे आणि आपण असे विधान करताना कोणाचे नाव घेतलेले नाही, असे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र चांदोरकर यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांनी पद्म पुरस्कार तसेच भारतरत्न किताब मिळणार्‍या व्यक्तींच्या राजकीय भूमिकांवर बंधन असावे, ही भावना व्यक्त केली आहे यात काही शंका नाही आणि त्यांचे स्पष्टीकरण ते कसे करणार आहेत असा प्रश्‍न विचारला जात आहे.