दिल्ली गँगरेप प्रकरणातील शर्मावर तुरूंगात हल्ला

दिल्ली – १६ डिसेंबरच्या रात्री दिल्लीत झालेल्या गँगरेप प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावल्या गेलेल्या पाच आरोपींपैकी एक विनय शर्मा याच्यावर तिहार जेलमध्ये झालेल्या हल्ल्यात त्याचा हात मोडला असून डोक्यालाही जखमा झाल्या आहेत. या सर्व आरोपींना त्यांनी फाशी विरोधात केलेल्या अपिलाच्या सुनावणीसाठी सोमवारी उच्च न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा शर्मा याने ही बाब न्यायाधीशांच्या कानावर घातली असल्याचे समजते. कोर्टात आलेल्या विनयचा हात प्लॅस्टरमध्ये होता व डोक्याला बँडेज बांधले गेले होते.

या विषयी न्यायाधीशानी विनय शर्मा याला विचारले असता त्याने रविवारी रात्री त्याच्या कोठडीत आलेल्या दोन जणांनी त्याला बेदम मारहाण केल्याचे सांगत तुरूंगात पुरेसे संरक्षण नसल्याची तक्रार केली. मात्र न्यायाधीशांनी ही बाब तुरूंगाधिकारयांना सांगावी अशी सूचना विनय शर्मा याला दिली असल्याचेही समजते.