उ. कोरियात ८० जणांना सार्वजनिक फाशी

सोल – उत्तर कोरियात या महिन्याच्या सुरवातीला ८० लोकांना सार्वजनिक फाशी देण्यात आल्याची बातमी जुंगआंग इलोबो वर्तमानपत्राने दिली आहे. उत्तर कोरियातील सात शहरातील ८० लोकांना सार्वजनिक स्वरूपात दिली गेलेली ही फाशी पाहण्यासाठी वोनसानच्या उत्तरेकडे असलेल्या स्टेडिअमवर दहा हजार जणांना आमंत्रण दिले गेले होते असाही खळबळजनक आरोप या वृत्तपत्राने केला आहे. ही शिक्षा प्रामुख्याने दक्षिण कोरियातील चित्रपट चोरून पाहणार्‍यांना दिली गेली असल्याचेही सांगितले जात आहे.

उत्तर कोरियात विदेशी आणि त्यातही दक्षिण कोरियात तयार झालेले चित्रपट अथवा टिव्ही शो पाहण्यावर बंदी असून असा अपराध हा गुन्हा समजला जातो. याच अपराधाबद्दल ८० जणांना ३ नोव्हेंबर रोजी मृत्यूदंड दिला गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सूत्रांचा हवाला देऊन सांगितले जात आहे. दक्षिण कोरियातील एका वेबसाईटवरून उत्तर कोरियातील प्रशासनाला आपल्या जनतेत होत असलेल्या मानसिक बदलांची भीती वाटत असून त्यांचा दृष्टीकोन बदलावा अथवा त्यांचा विकास व्हावा अशी प्रशासनाची इच्छाच नसल्याचा आरोपही केला गेला आहे.