टॅक्लोबान (फिलीपाइन्स) – फिलिपाइन्सच्या किनारपट्टीला हैयानफचा तडाखा बसल्यानंतर मृत्यूचे महातांडव पाहायला मिळाले. वादळामुळे मोठमोठी जहाजे शहरात येऊन आदळली. महावादळानंतर या भागात महालुटीला सुरुवात झाली आहे. अन्नान्नदशा झाल्याने लोक लूटमार करू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांत मृतांची संख्या 10 हजारांवर पोहोचली आहे.
देशातील सर्वात भीषण नैसर्गिक संकटाने लाखो लोकांना बेघर केले आहे. महावादळामुळे ताशी तीनशेहून अधिक वेगाने वारे वाहू लागले आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील शहरांची दाणादाण उडाली आहे. शुक्रवारी समुद्राचे रौद्र रूप पाहायला मिळाले. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांत पाणी शिरले आहे. हजारो घरांची पडझड झाली आहे. लाखो लोक बेघर झाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. नागरिक मदतीसाठी धावाधाव करत आहेत.
सुनामीसारख्या अजस्र लाटांनी किनारपट्टीला जबरदस्त तडाखा बसला आहे. त्यात सुमारे दोन लाख लोकसंख्येचे टॅक्लोबान शहर जवळपास उद्ध्वस्त झाले आहे. वर्षानुवर्षे ज्या घरात सुख-दु:ख अनुभवले ते घर आणि कुटुंब डोळ्यासमोर नाहीसे होताना पाहताना असंख्य माणसे वेड्यासारखी झाली आहेत. शहरात सर्वत्र मृतदेहांचे खच पडल्याचे भयंकर चित्र दिसते. लोक खूप हतबल आहेत. वादळग्रस्त भागात भूक व जिवाच्या आकांताने लाखो लोक लूटमार करू लागले आहेत. कुटुंबीय, कच्च्ेबच्चे वाचवण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला आहे.
काही भागात मदत न मिळाल्याने लोक हिंसक बनले आहेत. लोकांचा जमाव वादळात उरल्या-सुरल्या मॉल्स व दुकानांची सर्रास लूट करताना दिसून आला. दुकानातून काही खाद्यपदार्थ मिळतात का, याचा शोध घेतला जात आहे.