धोकेबाज पत्नीला पोटगी नाही – न्यायालय

मुंबई – पत्नीने परपुरुषासोबत संबंध ठेवल्यास तिला उदरनिर्वाह भत्ता मागण्याचा अधिकार नाही, असा निकाल मुंबईच्या सत्र न्यायालयाने दिला आहे. दक्षिण मुंबईत राहणा-या एका 38 वर्षीय महिलेने उदरनिर्वाह भत्ता मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने या मुद्यावरून तिची याचिका फेटाळली.

न्यायालयाने निर्णय देताना म्हटले की, पत्नीने पतीशिवाय इतर पुरुषासोबत संबंध ठेवल्यास तिला उदरनिर्वाह भत्ता मागण्याचा हक्क मिळत नाही. स्वतःच्या चुकांचा तिला लाभ घेण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. न्यायालयाने हा निर्णय देतानाच तिच्या पतीचा घटस्फोटाचा अर्जही मंजूर केला. पतीने कू्ररता आणि धोका देण्याच्याआधारावर घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. पत्नीने पतीचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे घटस्फोट देण्यात येतो, असे न्यायालयाने म्हटले.

दोघांचा विवाह 1999 मध्ये झाला होता. दोघांचा 12 वर्षांचा एक मुलगाही आहे. पतीचा व्यवसाय आहे. व्यवसायामुळे तो बहुतांश वेळा रात्री 10 नंतर घरी जायचा. पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करताना म्हटले होते की, नोव्हेंबर 2005 मध्ये एक दिवस मी लवकर घरी गेलो होतो. त्या वेळेस मुलगा एकटाच घरी होता. त्यानंतर पत्नीला फोनवरून संपर्क केला; परंतु फोन बंद होता. सायंकाळी ती घरी आली, तेव्हा तिने मैत्रिणीसोबत बाहेर गेल्याचा दावा केला. त्या मैत्रिणीला मी विचारणा केली असता तिने कोणालाही भेटली नसल्याचे सांगितले.

त्यानंतर दुस-या दिवशी पत्नीने मान्य केले की, ती शेजार्‍यासोबत हॉटेलमध्ये गेली होती. मी नंतर आणखी माहिती काढली, तेव्हा शेजा-यांनी अनेक किस्से सांगितले. माझ्या अनुपस्थितीत शेजारी घरीही सतत येत होता. आजूबाजूच्या लोकांनी तिला त्याच्यासोबत अनेकदा पाहिले होते. या प्रकारानंतर पतीने डिसेंबर 2005 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. संबंधित महिलेचे अनेक वर्षांपासून शेजार्‍यासोबत विवाहबाह्य संबंध होते आणि त्या शेजार्‍यासोबत मुलगा आनंदी असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. न्यायालयाने या प्रकरणी आणखी दोन शेजार्‍यांचीही साक्ष ग्राह्य धरली. त्यांनीही तिच्या विवाहबाह्य संबंधांना दुजोरा दिला होता.