मुंबईत आढळला कोरोनाच्या एक्सई सब व्हेरिएंटचा पहिला रुग्ण


मुंबई – ब्रिटनमध्ये आढळलेल्या एक्सई या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने बाधित असलेला एक रुग्ण मुंबईत आढळला आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये हे मुंबई महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे. भारतातील हा एक्सईचा पहिलाच रुग्ण आहे. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे.

महिनभरापूर्वी म्हणजे २ मार्चला हा रुग्ण कोरोनाबाधित होता. त्याला कोणतीही लक्षणे नव्हती. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३ मार्चला कोरोनामुक्तही झाला. मुंबईत गेल्या महिनाभरात रुग्णसंख्या वाढलेली नाही. या उलट कमीच झालेली आहे. त्यामुळे याच्या विषाणूच्या प्रकाराचा प्रसार तीव्रतेने झालेला नाही आणि हा विषाणूचा प्रकार निश्चितच धोकादायक नाही, हे यावरून दिसून येते.

ही महिला वेशभूषाकार असून चित्रीकरणाच्या समूहामध्ये सहभागी असते. फेब्रुवारीमध्ये ही महिला दक्षिण आफ्रिकेहून भारतात आली होती. तिला त्यावेळी कोरोनाची बाधा झालेली नव्हती. परंतु चित्रीकरणामध्ये नियमितपणे केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये २ मार्चला ती बाधित आढळली. तिचे नमुने चाचणीसाठी पाठविले असता एक्सईची बाधा झाल्याचे आढळले आहे. ३ मार्चचला दिलेल्या नमुन्यामध्ये ही महिला करोनामुक्त झाल्याचेही आढळले आहे. या महिलेने लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या होत्या आणि ती लक्षणे विरहित होती.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अकराव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २३० रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. यात ‘ओमिक्रॉन’चे २२८ अर्थात ९९.१३ टक्के रुग्ण आढळले आहेत. उरलेल्या दोन बाधितांपैकी एक जण ‘कापा’ उपप्रकाराने तर अन्य एक जण ‘एक्सई’ उपप्रकाराने बाधित होता, असे निष्पन्न झाले आहे.

ब्रिटनमध्ये एक्सई हा कोरोनाचा व्हेरिएंट जानेवारीमध्ये आढळला आहे. या विषाणूचे जगभरात ६०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. हा विषाणू ओमिक्रॉनचे बीए.१ आणि बीए.१ या सब व्हेरिएंटचे उत्परिवर्तन होऊन निर्माण झाला आहे. यामध्ये बीए.१ आणि बीए.२ जनुकीय घटकांचे मिश्रिण झाल्याचे आढळले आहे. बीए.१ आणि बीए.२ हे दोन्ही सब व्हेरिएंट देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून आढळत आहेत. त्यामुळे यांचेच गुणधर्म असलेल्या नव्या विषाणूपासून सध्या कोणताही धोका आहे, असे वाटत नाही. तिसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या बाधित झाल्यामुळे करोनाविरोधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने तरी भारताला विषाणूच्या नव्या प्रकाराचा धोका नाही, असे मत कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे.