मतदानोत्तर चाचणीला बंदी

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक होत असलेल्या पाच राज्यांत मतदानोत्तर चाचणी (एक्झिट पोल) चे निष्कर्ष जाहीर करण्यावर ११ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीसाठी बंदी घातली आहे. ४ डिसेंबरला या विधानसभा निवडणुकांचे मतदान संपेल तेव्हाच हे निष्कर्ष जाहीर करावेत, असे आयोगाने बजावले आहे. अशा प्रकारचे आदेश आयोगाने पाचही राज्यातील मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना पाठवले आहेत.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये १५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या दरम्यान विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने काही संस्थांनी मतदारांची सर्वेक्षणे केली असून त्या सर्वेक्षणानुसार चारही राज्यात कॉंग्रेसचा पराभव होणार आहे. सर्वेक्षणाचे असे चित्र निर्माण झाल्यास मतदार आपल्या बाजूला वळणार नाहीत असे वाटल्यावरून कॉंग्रेसच्या नेत्यांनी मतदारांच्या चाचण्यावरच बंदी घालावी, अशी मागणी केली होती. मात्र आयोगाने ही मागणी तशीच मान्य केली नाही. एक्झिट पोलच्या बाबतीत पूर्वी घेतलेले निर्णय आता कायम ठेवले आहेत.

११ नोव्हेंबरला छत्तीसगडमध्ये मतदान होईल आणि ४ डिसेंबरला दिल्लीत मतदान होईल. या काळात झालेल्या मतदानाचे त्या त्या राज्यातल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष त्या राज्यात सुद्धा जाहीर करायला आयोगाने बंदी घातली आहे. म्हणजे ११ नोव्हेंबरच्या सकाळच्या ७ वाजल्यापासून ४ डिसेंबरच्या संध्याकाळच्या साडेपाच वाजेपर्यंत आता कसलाही पोलचा निर्णय ऐकायला मिळणार नाही. याच काळात मतदान झाल्याबरोबर वृत्तवाहिन्यांना सुद्धा मतदारांच्या प्रतिक्रिया प्रसारित करता येणार नाहीत.