भाजपच्या मोठमोठ्या बाता-सोनिया गांधी

कोंडगाव(छत्तीसगड)- काँग्रेस पक्षाला त्यागाचा आणि विकासाचा इतिहास आहे. गरिबांच्या व दुर्बल घटकांच्या जीवनाचा कायापालट करून त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचे काम काँग्रेसने केले आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाबाबतचा अभिमान व्यक्त करतानाच छत्तीसगडमधील अकार्यक्षम प्रशासनाबद्दल भाजपला खडे बोल सुनावले.

11 नोव्हेंबरपासून छत्तीसगडमध्ये सुरू होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांची येथे पहिलीच प्रचार सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी या वर्षी मे महिन्यात छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली. काँग्रेस पक्ष अगदी पूर्वीपासून त्यागाचा वारसा चालवत आहे आणि गरीब आणि उपेक्षितांसाठी काम करत आहे. एकीकडे एक पक्ष अशा प्रकारे कार्यरत असताना दुसरीकडे भाजपकडून मोठ-मोठे दावे करण्यापलीकडे काहीही केले जात नाही, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.