मुंबई – नव्वद टक्के भारतीयांचा मोदींना विरोध आहे, असे प्रसिद्ध गीतकार आणि राज्यसभेचे खासदार जावेद अख्तर यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते भारताचे भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना 90 टक्के लोकांनी नापसंत केले आहे. नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलल्यामुळे आपल्याला अश्लील मॅसेज येत असल्याची तक्रारही जावेद अख्तर यांनी केली आहे.
नरेंद्र मोदींना विरोध करणे म्हणजे देशविरोधी कारवाई असल्याचे अनेक जण मानतायेत, यावरही जावेद अख्तर यांनी आक्षेप घेतला आहे. सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर आज जावेद अख्तर यांनी ट्विट केलंय, काही मुर्ख लोक मला समजावत आहेत की, नरेंद्र मोदींना विरोध करणं म्हणजे देशविरोध कारवाई करण्यासारखं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे का 90 टक्के भारतीय देशविरोधी आहेत.
मागील महिन्यात पाटणामध्ये जावेद अख्तर यांनी मोदी हे चांगले पंतप्रधान होऊ शकत नाही, असा दावा केला होता. कारण मोदींचा लोकशाहीवर विश्वास नाही, असं अख्तर म्हणाले होते. मोदी आपल्या मंत्र्यांसोबत नोकरासारखा व्यवहार करतात, असा आरोपही त्यांनी मोदींवर केला होता. त्यामुळं पुन्हा एकदा आता या वादाला तोंड फुटले आहे.