नीरा नदीपात्रात मिळाले मृतदेह

पुणे – पुण्यातील चार मित्रांच्या बेपत्ता होण्याचे गूढ उकलले आहे. हे चारही मित्र प्रवास करत असलेली कार नीरा नदीच्या पात्रात सापडली. शिवाय कारमध्ये तीन मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले आहे. एनडीआरएफच्या जवानांनी ही कार बाहेर काढली. चौघांपैकी चिंतन बुच या तरुणाचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रात सापडला होता. त्यानंतर एनडीआरएफचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीने नदीच्या पात्रात शोध सुरू होता. अखेर आज उर्वरित तिघांचे मृतहेददेखील नदीपात्रात असलेल्या कारमध्ये सापडले. प्रणव लेले, चिंतन बुच, साहिल कुरेशी आणि श्रृतिका चंदवाणी हे पुण्यातील जाहिरात कंपनीत हे चौघेही काम करत होते.

दिवाळीची सुट्टी असल्याने त्यांनी देवदर्शनाचा प्लॅन केला. श्रृतिका ही मूळची कोल्हापूरची असून तिला कोल्हापुरात सोडून तीन मित्र कर्नाटकातील गोकर्णला जाणार होते. या सर्वांचे मोबाईल फोन स्वीच ऑफ झाल्याने प्रणव लेले यांचे वडील अशोक लेले यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सातारा जिल्ह्यातील कापूरहोळ हे त्यांचं शेवटचे लोकेशन ट्रेस झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही माहिती न मिळाल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. अखेर एका तरुणाचा मृतदेह काल आणि तिघांचे मृतदेह आज गुरूवारी सापडले.

याबाबत अधिक महिती अशी की, पुण्यातून बेपत्ता झालेल्या चार मित्रांचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या चारही मित्रांना जलसमाधी मिळाली. चौघांचेही मृतदेह नीरा नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अचानक बेपत्ता झालेल्या चार मित्रांच्या गाडीचा शोध लागला. याच गाडीत तिघांचे मृतदेह आढळले आहेत. नीरा नदीच्या पात्रात दोन पुलांच्यामध्ये पाण्याखाली आज या तरुणांची गाडी सापडली. क्रेनच्या सहाय्याने ही गाडीवर काढण्यात आली. स्थानिक मच्छिमार आणि एनडीआरएफचे जवान ही शोध मोहीम करत होते. त्यांच्या शोध मोहिमेला यश मिळाले. मात्र चार तरुणांच्या घरावर आभाळ कोसळले आहे.

पुण्यातील एका जाहिरात कंपनीत हे चौघंही काम करत होते. दिवाळीची सुट्टी असल्याने त्यांनी देवदर्शनाचा त्यांनी प्लान केला होता. मात्र पाच दिवसांनंतर त्यांचे मृतदेह सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काल या चार मित्रांपैकी चिंतन बुचचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रात आढळून आला होता. त्यानंतर इतर तिघांचा शोध सुरू होता. आज सकाळी गाडीचा शोध लागला आणि गाडीतच तिघांचे मृतदेह सापडले. गाडीचा अपघातच झाला असल्याचा अंदाज आता पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र हा अपघात कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.