परवेझ मुशर्रफ जामीनावर सुटले

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना लाल मशीद उपाध्यक्ष हत्येप्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची दोन दिवसांनी म्हणजे बुधवारी नजरकैदेतून मुक्तता करण्यात आली असल्याचे समजते. मुशर्रफ यांच्यावर दाखल असलेल्या चार केसेसपैकी तीन केसमध्ये त्यांना यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला असून त्यात माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येत हात असल्याप्रकरणी दाखल असलेल्या दाव्याचाही समावेश आहे. मुशर्रफ यांच्या वकीलांनी १-१ लाख रूपयांची जामीन रक्कम भरल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाजिद अलि यांनी मुशर्रफ यांच्या मुक्ततेचे आदेश दिले.

पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुका लढविण्यासाठी परदेशातून परतलेल्या मुशर्रफ यांच्यावर देशात खटले भरण्यात आले आणि एप्रिलपासून त्यांच्या इस्लामाबाद येथील फार्महाऊसवरच त्यांना नजरकदेत ठेवले गेले होते. जामीन मंजूर झाल्यानंतर या फार्म हाऊसवरील जेल अधिकारी आणि पोलिस हटविले गेले असल्याचे समजते. मुशर्रफ यांचे वकील अहमद रजा कसुरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून मुशर्रफ  आज म्हणजे गुरूवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुशर्रफ यांच्या मुक्ततेची बातमी कळताच त्यांच्या हजारो समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी करून घोषणा दिल्या.
 
विरोधी पक्षांनी मात्र मुशर्रफ आणि पाक सरकार यांच्यात गुप्त समझौता झाला असल्याचा आरोप केला आहे.