आर्थिक फसवणुकीसाठी रघुराम राजन यांच्या नावाचा वापर

मुंबई – इंटरनेटच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून त्यांचा पैसा लुटणार्‍या टोळ्यांची हिम्मत अधिकच वाढली असल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन तीन दिवसांत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाने हजारो भारतीयांना करोडो रूपयांची लॉटरी लागली असल्याचे ईमेल पाठविले गेले आहेत. हा प्रकार पाहून अशा फ्रॉडवर नियंत्रण आणणार्याय सरकारी यंत्रणा हैराण झाल्या असल्याचेही सांगितले जात आहे.

दोन महिन्यांपूर्वीच इंटरनेट माध्यमातून होत असलेली आर्थिक फसवणूक नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँका, सुरक्षा संस्था व अन्य संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक घेऊन या सर्व यंत्रणात परस्पर समन्वय साधला जावा असा प्रस्ताव मांडला होता. मात्र त्यामुळे र्बंका व अन्य वित्तिय संस्थांना कांहीसे संरक्षण मिळू शकले तरी सर्वसामान्यांची लूट सुरू राहणार असल्याचा धोका व्यक्त केला गेला होता. आता राजन यांच्या नावाने आलेल्या बनावट ईमल मुळे असल्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

रिझर्व्ह बँकेचे क्षेत्रीय निर्देशक दीपक सिंघल या संदर्भात म्हणाले की पूर्वी असल्या फ्रॉडमध्ये नायजेरियन लोकांचा सहभाग लक्षणीय होता मात्र आता भारतीयही असले फ्रॉड करण्यात सरावले असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी लोकांमध्ये या प्रकारांची जागृती करणे हाच खात्रीचा उपाय आहे.