लहानपणात ज्यांच्यात संगीत वाद्ये शिकण्याची आवड असते अथवा जे लहान पणात संगीत शिकतात, तर त्याचा फायदा संबंधितांना त्यांच्या म्हातारवयात निश्चित स्वरूपात होतेा असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. जे लहान वयातच संगीत वाद्ये शिकतात, त्यांचा मेंदू व कान म्हातारपणात अधिक तल्लख राहतात असे दिसून आले आहे. इतकेच नव्हे तर लहानपणात संगीत शिकले व नंतर अगदी चाळीशी पार करेपर्यंत पुन्हा संगीताशी संबंध आला नाही तरीही लहान पणातील या मेहनतीचा फायदा म्हातारपणात मिळतो असेही आढळून आले आहे.
अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातील संशोधकांनी या प्रयोगासाठी प्रकृती निकोप असलेल्या ४४ जणांची निरीक्षणे नोंदविली. त्यांना केवळ डा हा एकच ध्वनी ऐकविला गेला आणि त्यांचा मेंदू किती जलद हा स्वर ओळखतो याच्या चाचण्या घेतल्या गेल्या. ज्यांनी लहान वयातही संगीताचा अभ्यास केला होता, त्यांच्या मेंदूकडून मिळालेला प्रतिसाद अधिक जलद होता. संशोधकांच्या मते आपण बहिरेपणा हा कानाचा दोष मानतो मात्र प्रत्यक्षात या ऐकण्याच्या क्रियेत मेंदूकडून होणारी मदत लक्षणीय असते. यामुळेच स्वरांचे ज्ञान प्रथम मेंदूलाच होत असते.लहानपणी केलेली संगीतसाधना मेंदू तल्लख ठेवण्यास अतिशय मदतगार ठरते असे त्यांना दिसून आले.