अरबस्तानातून १.३४ लाख भारतीय परत

नवी दिल्ली – सौदी अरबस्तानमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्याने नोकर्‍या देण्याचे धोरण राबवले जात आहे. या धोरणाला निताकत पॉलिसी असे नाव देण्यात आले असून त्यानुसार पाच पेक्षा अधिक कर्मचार्‍यांना नोकरी देणार्‍या उद्योजक, व्यापार्‍याला किमान एका स्थानिक कामगाराला नोकरी द्यावी लागणार आहे. सरकारच्या या धोरणामुळे सौदी अरबस्तानातून अनेक भारतीय कामगार, कर्मचारी स्वदेशी परत येत आहेत. चालू वर्षी असे १ लाख ३४ हजार कर्मचारी, कामगार परत आले आहेत, अशी माहिती परदेशस्थ भारतीय व्यवहार खात्याचे मंत्री वायलर रवि यांनी दिली.

सौदी अरबस्तानात भारतातून गेलेल्या कामगार, कर्मचार्‍यांची संख्या २४ लाखावरून २८ लाखांवर गेली आहे. एका बाजूला ही संख्या वाढत असली तरी अरबस्तानातल्या स्थानिक तरुणांमध्ये त्याबद्दल नाराजी पसरली आहे. त्यांनी आपल्याला नोकर्‍या दिल्या जाव्यात, अशी मागणी केली आहे. देशातले तरुण बेकार असताना परदेशातल्या लोकांना अशा नोकर्‍या देणे योग्य नाही असे म्हणून त्यांनी आंदोलन उभारले आणि त्याची दखल घेऊन तिथल्या सरकारने निताकत पॉलिसी जाहीर केली.

हे धोरण जारी झाल्यानंतर सरकारने परदेशस्थ कामगार, कर्मचार्‍यांना देश सोडून जाण्यासाठी सात महिन्यांची मुदत दिली. आपण निताकत पॉलिसीनुसार नोकरीवर राहण्यास पात्र आहोत असे सिद्ध करण्याची जबाबदारी कामगारांवर टाकली. मात्र तसे सिद्ध न करणार्‍या कामगारांना स्वदेशी परत यावे लागत आहे. या शिवाय सौदी अरबस्तानात गेलेले अनेक भारतीय विनापरवाना, चोरट्या मार्गाने गेले असून त्यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे नाहीत. अशा अवैध वास्तव्य कामगारांनाही तिथले सरकार त्यांच्या त्यांच्या देशात पाठवून देत आहे.