बंगळूर – केंद्र सरकारच्या एका योजनेमुळे बंगळूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला डिझेल आणि बॅटरी या दोन्ही इंधन साधनांवर पळणार्या बसगाड्या मिळणार असून त्या बसगाड्यांमुळे अशी वाहने चालवणारे बंगळूर हे देशातले पहिले शहर ठरणार आहे. लवकरच या गाड्या महानगरपालिकेला मिळतील. केंद्र सरकारने निधी मंजूर केल्यामुळे महानगरपालिकेने ५० बसगाड्या पुरविण्याची निविदा सूचना जारी केली आहे.
असे हायब्रिड डिझेल वाहन बॅटरी आणि डिझेल अशा दोन्ही इंधनांवर धावते. ७० टक्के डिझेल आणि ३० टक्के बॅटरी असा दोन्हींचा वापर होतो. गाडी डिझेलवर चालायला लागते आणि इंजिन सुरू असल्यामुळे बॅटरी चार्ज होते. बॅटरी पूर्ण चार्ज झाली की, डिझेल इंजिन आपोआप बंद होते आणि गाडी बॅटरीवर चालायला लागते. बॅटरीची चार्जिंग संपली की, डिझेल इंजिन आपोआप सुरू होते. अशा या गाड्या ताशी ७० कि.मी. पर्यंतच्या वेगाने पळू शकतात. अशा ५० गाड्यांची निविदा सूचना जारी केली आहे.
तूर्तास बंगळूर शहरात पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरवर चालणारी सुद्धा एक बस प्रायोगिक तत्वावर पळवली जात आहे. ३४ आसनांची ही गाडी विजेवर चार्ज होणार्या बॅटरीवर चालते आणि ती पूर्णपणे वातानुकूलित आहे. एका चार्जिंगमध्ये ती ७० कि.मी. पळते आणि तिला विविध ठिकाणच्या चार्जिंग पॉईंटमधून चार्जिंग केली जाते. या दोन्ही प्रकारच्या गाड्यांतून पर्यावरणाचे रक्षण आणि विजेची बचत हे दोन्ही उद्देश साध्य होणार आहेत.