बुर्ज खलिफाचे सल्लागार करणार पटेल पुतळ्यावर देखरेख

अहमदाबाद – जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून नोंदविल्या जाणार्‍या सरदार पटेल यांच्या नर्मदा नदीतील बेटावर उभारल्या जात असलेल्या पुतळ्याच्या देखरेखीचे काम दुबईत जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाच्या सल्लागार कंपनीकडेच दिले जाणार असल्याचे वृत्त आहे. टर्नर प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या भारतीय विभागाकडे हे काम दिले जात आहे असे समजते.

सरदारांच्या पुतळा उभारणीची कोनशीला नुकतीच गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांनी बसविली असून त्याचे पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. सरदार सरोवर धरणाकडे तोंड करून हा पुतळा उभारला जाणार असून त्याची उंची आहे तब्बल १८२ मीटर. या पुतळ्यासाठी जो चौथरा उभारला जाणार आहे त्याच्यासकट ही उंची आहे २४० मीटर. या कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी २०६३ कोटी रूपये खर्च येणार असून एकूण प्रकल्पाचा खर्च २५०० कोटींच्या घरात जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पुतळा, नदी आणि बेटाला जोडणारा पूल, तसेच नदी काठच्या १२ किमी लांबीच्या रस्त्याचे पुनर्निमाण अशी कामे केली जाणार आहेत. प्रकल्पाचे पहिले दोन टप्पे ४२ महिन्यात पूर्ण केले जाणार आहेत.

हा पुतळा जगातील सर्वाधिक उंच पुतळा असणार आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवता पुतळ्याची उंची चौथर्‍यासह ९३ मीटर आहे. हा पुतळा उभारण्यापूर्वी पूर्ण संशोधन केले गेले असून त्यात भूगर्भ, वार्‍यांचे प्रवाह, वातावरण अशा अनेक बाबी विचारात घेतल्या गेल्या असल्याचे गुजराथ पर्यटन विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. पटेल यांनी सांगितले. ते म्हणाले की या कामासाठी जागतिक टेंडर्स मागविण्यात आली असून त्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत आहे.

मुख्यमंत्री मोदी यांनी गुजराथेतील शेतकर्‍यांना या पुतळ्यासाठी त्यांच्या शेती अवजारातील लोखंडी तुकडे दान करण्याचे आवाहन केले आहे. ३१ आक्टोबर ते ३१ जानेवारी १४ पर्यंत हे लोखंड स्वीकारले जाणार असून त्यानंतर ते वितळवून पुतळ्यासाठी वापरले जाणार आहे.