राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली – भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना नोटीस धाडली आहे. उत्तरप्रदेशातील भाषणादरम्यान राहुल गांधींनी चिथावणीखोर आणि सामाजविघातक विधान केल्याचा आरोप आहे. राहुल गांधींना चार दिवसात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तरप्रदेशातील दौर्‍यावेळी मुज्जफरनगर दंगलींबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपनं तक्रार दाखल केली होती.

आयएसआयच्या मदतीनं धर्मवादी संघटनांनी, मुजफ्फरनगरची दंगली घडवली असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केला होता. भाजप समझतं की, उत्तरप्रदेशात हिंदू-मुस्लिम मुद्दा नसेल, तोपर्यंत चांगलं काम करू शकणार नाही. त्यामुळेच ते आग लावतात आणि ती आग काँग्रेसला विझवावी लागते, असं राहुल म्हणाले. त्यामुळे भाजपचा रागाचा पारा चढला आणि भाजपनं काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.

राहुल गांधींनी आचारसंहितेचा भंग केला, असं भाजपचं म्हणणं आहे. याशिवाय काँग्रेसची मान्यता रद्द करण्याचीही मागणीही भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली. भाजपने निवडणूक आयोगाला सहा पानी तक्रार अर्ज केला होता. राहुल गांधींनी इंदोरमध्ये पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय ही मुजफ्फरनगर दंगल पीडित मुस्लिम युवकांच्या संपर्कात, असं विधान केल्याचं भाजपने तक्रार अर्जात म्हटलं होतं.