नवी दिल्ली – इंधन तेल आणि स्वयंपाकाचा गॅस यांच्या किंमतींचा विचार करण्याबाबत केंद्र सरकारने नेमलेल्या किरीट पारीख यांच्या तज्ज्ञ समितीने डिझेलचे भाव लिटरमागे पाच रुपयाने तर रॉकेलचे भाव लिटरमागे चार रुपयांनी वाढविण्याची शिङ्गारस केली आहे. या समितीचे अध्यक्ष किरीट पारीख हे नियोजन आयोगाचे माजी सदस्य आहेत. त्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या टाकीची किंमत २५० रुपयांनी वाढविण्याची सुद्धा शिङ्गारस केली आहे.
अशी दरवाढ केल्यास इंधन तेलावर दिल्या जाणार्या सबसिडीमध्ये ७२ हजार कोटी रुपयांची दरवर्षी बचत होईल, असे या समितीने म्हटले आहे. रॉकेल आणि डिझेलचे भाव खुल्या बाजारात कितीही वाढले तरी त्यावर दिली जाणारी सबसिडी डिझेलला लिटरला सहा रुपये आणि रॉकेलला लिटरला चार रुपये अशी निश्चित स्वरूपाची असावी. बाजार भावात होणारी वाढ ग्राहकांच्यावर टाकावी, असे पारीख यांच्या समितीने म्हटले आहे.
स्वयंपाकाच्या गॅसची टाकी २५० रुपयांनी महाग करावी. अनुदानित टाक्या मर्यादित कराव्यात, एका कुटुंबाला वर्षाला नऊ टाक्या देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ही संख्या सहा पर्यंत कमी करावी, असेही या समितीने सूचित केले आहे. हा अहवाल नुकताच सरकारला सादर करण्यात आला आहे. मात्र या वाढी ताबडतोब लागू केल्या तर त्यांचा विधानसभा निवडणुकांवर परिणाम होईल म्हणून सरकार या अहवालाचा विचार सावकाशीने करणार असल्याचे समजते.