पाटणा – नरेंद्र मोदी यांची हुंकार रॅली झालेल्या पाटण्याच्या गांधी मैदानात पोलिसांना आणखी पाच बॉम्ब सापडले आहेत. याच मैदानात गुरुवारी आणखी एक जाहीर सभा होणार आहे. त्या निमित्ताने पोलिसांनी या मैदानाची कसून तपासणी सुरू केली तेव्हा त्यांना हे पाच बॉम्ब सापडले. याच मैदानात गेल्या रविवारी हुंकार रॅलीच्या दरम्यान झालेल्या पाच स्ङ्गोटांमध्ये ६ जण ठार तर ८२ जखमी झाले आहेत.
काल या मैदानावर सापडलेले बॉम्ब पोलीस माहिती केंद्र, चाईल्ड पार्क, मगध महिला कॉलेजचे समोरचे मैदान या ठिकाणी सापडलेले आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक मनोजकुमार तिवारी यांनी दिली. मैदानाची तपासणी सुरू झाल्याबरोबर काही मिनिटातच हे बॉम्ब सापडले. सापडल्याबरोबर यातले दोन बॉम्ब निकामी करण्यात आले आणि उर्वरीत बॉम्ब तपासणीसाठी पाठविण्यात आले.
गुरुवारी या मैदानावर सीपीआय (एमएल) लिबरेशन या संघटनेची जाहीर सभा होणार आहे. या सभेत काही घातपात होऊ नये यादृष्टीने पोलीस मैदानाची तपासणी करीत होते.