अमिताभ बच्चन स्मार्ट गुंतवणूकदारही

मुंबई – बॉलिवूडचा शेहनशाह अमिताभ बच्चन केवळ गुणी कलाकारच नाही तर तो सुज्ञ गुंतवणूकदारही आहे. जस्ट डायल या भारतीय सर्च इंजिन फर्ममध्ये अमिताभने केलेली गुंतवणूक अतिशय फायद्याची ठरली असून केवळ दोन वर्षात त्याच्या या गुंतवणुकीने १०० पट वाढ नोंदविली आहे.

जस्ट डायल कंपनीतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिताभ बरोबर कंपनीने तीन वर्षांसाठीचा जाहिरात करार केला होता. अभिताभ कंपनीचा ब्रँड अँबॅसिडर होता. त्यावेळी मानधनाबरोबरच कंपनीचे शेअर अभिताभला देण्यात आले होते.१० रूपये किमतीचे ६२७९४ शेअर्स अमिताभच्या मालकीचे आहेत व हे शेअर त्याने २०१० च्या डिसेंबर मध्ये घेतले आहेत. जस्ट डायलने आपल्या व्यवसायात कमालीची वाढ नोंदविली असून  त्यांच्या व्यवसाय दोन वर्षात ११२.६६ कोटींवर गेला आहे. ही कंपनी नुकतीच स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाली आहे.

आता या शेअरची किमत चांगलीच वाढली असून अभिताभकडे असलेल्या शेअरची किमतही ६.२७ लाख रूपयांवरून चक्क ६ .६ कोटी रूपयांवर गेली आहे. अमिताभकडे कंपनीच्या शेअरचा असलेला हिस्सा ०.१ टक्के इतका आहे.