सरबजितसिंगच्या वस्तू पाककडून परत मिळणार

इस्लामाबाद – भारतीय हेर असल्याच्या व १९९० मध्ये पाकिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटात हात असल्याच्या आरोपावरून पाक तुरूंगात मृत्यूदंडाची शिक्षा भोगतानाच कैद्यांनी केलेल्या मारहाणीत ठार झालेल्या भारतीय नागरिक सरबजितसिग याच्या मालकीच्या वस्तू त्याच्या कुटुंबियांकडे परत करण्यास पाक सरकारने तयारी दर्शविली आहे.

सरबजितच्या मृत्यूनंतर त्याची बहिण दलबीरकौर हिने गृहमंत्री सुशीलकुमार शिदे यांची भेट घेऊन सरबजितच्या वस्तू, कपडे व त्याने तुरूंगात शिक्षा भेागताना रोजगार म्हणून मिळविलेले पैसे त्याच्या कुटुंबियांना परत मिळावेत यासाठी याचना केली होती. त्यानुसार भारतीय अधिकार्‍यांनी पाक तुरूंग अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यावर पाक सरकारने सरबजितच्या वस्तू परत करण्याची तयारी दर्शविली असून या वस्तू पुढच्या महिन्यात त्याच्या कुटुंबियांना सोपविल्या जाणार आहेत.

लाहोरच्या कोट लखपत तुरूंगात सरबजित शिक्षा भोगत होता. तेथे असलेले त्याचे कपडे, कुराणाची प्रत, तीन धार्मिक पुस्तके, चपला, बूट इत्यादी सामान परत केले जाणार आहे.