मोदी आणि मौलवीतील अंतर कमी होतेय्

लखनौ – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मुस्लिमांचा शत्रू असे कायम समजत राहण्यापेक्षा त्यांच्याशी तडजोड करावी, मैत्री करावी असा विचार काही मुस्लीम धर्मगुरुंच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र मौलवींच्या दुसर्‍या गटातून या विचाराला प्रचंड विरोध होत आहे. असा विरोध होत असला तरी मुस्लीम समाजात नरेंद्र मोदी यांच्या संबंधात काही एक विचार केला जात आहे हे निश्‍चित आहे. विशेषत: खुद्द नरेंद्र मोदी यांनी आपल्या अलीकडच्या प्रचाराच्या सभांमध्ये मुस्लिमांच्या विरोधात काही वक्तव्ये केलेली नाहीत. उलट मुस्लीम धर्मियांविषयी आस्था व्यक्त करणारे विचार मांडले आहेत.

मौलाना कलदे सादिक आणि मौलाना मेहमूद मदनी या दोन धर्मगुरूंनी नरेंद्र मोदी यांच्या बाबत सौम्य धोरण स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. मात्र २००२ साली गुजरातेत झालेल्या दंगलीचे परिणाम अजूनही काही मौलवींच्या मनावर कायम आहेत. त्यांनी या तडजोडीच्या धोरणांना कसून विरोध केला आहे. जमाते इस्लामी हिंद या संघटनेचे सरचिटणीस महमद सलीम इंजिनिअर हे असा विरोध करणार्‍यांत आघाडीवर आहेत. मुस्लिमांच्या हत्यांची भरपाई विकासाला होऊ शकणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांना आपलेसे करावे, असा विचार काही मौलवी मांडतात. परंतु आपल्या समाजाचा त्यांना पाठींबा नाही हे त्यांच्या लवकरच लक्षात येते. २५० मुस्लीम नेत्यांची या संबंधात मते जाणून घेतली असता ९० टक्के नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मत व्यक्त केले आहे. ही गोष्ट मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य जाङ्गरयाब जिलानी यांनी नजरेस आणून दिली आहे.