केजरीवाल यांच्या विरुद्ध बदनामीचा खटला

नवी दिल्ली – आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध दिल्लीच्या मुख्य महानगर न्यायदंडाधिकार्‍यांच्या कार्यालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला. २०१२ च्या ऑक्टोबरमध्ये अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलन पुकारले होते आणि त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये केलेल्या भाषणातून त्यांनी आपली बदनामी केली असा दावा मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे राजकीय सचिव पवन खेरा यांनी दाखल केला आहे.

या भाषणाच्या न्यायालयात दाखल झालेल्या वृत्तांतावरून अरविंद केजरीवाल यांनी खेरा यांची बदनामी केल्याचे सकृतदर्शनी आढळले आहे म्हणून मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी संजय बन्सल यांनी ही ङ्गिर्याद दाखल करून घेऊन केजरीवाल यांच्या विरुद्ध आरोप निश्‍चित केले आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी या आरोपांचा इन्कार केला असून आपण सरकारच्या विरोधात जे काही बोललो त्याचा पवन खेरा यांच्याशी काहीही संबंध नसतानाही त्यांची आपली बदनामी झाली असा आळ आपल्यावर घेतला आहे. सरकारच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काही बोलल्याने पवन खेरा यांची बदनामी कशी काय होते, त्यांचा सरकारशी काय संबंध आहे किंवा मुख्यमंत्र्यांशी त्यांचा काय संबंध आहे हे खेरा यांनी स्पष्ट केलेले नाही.

या उपरही आपण सरकारच्या विरुद्ध जे बोललो त्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. सरकारने दिल्लीत वीज पुरवठा करणार्‍या कंपन्यांना दरवाढीची अनुमती दिली होती आणि त्या बदल्यात या कंपन्यांनी सरकारला काही ङ्गायदे करून दिलेले होते हे आपण सिद्ध करून देऊ शकतो. एवढे करूनही त्यामुळे सरकारची बदनामीच झाली असेल तर या बदनामीशी पवन खेरा यांचा काहीही संबंध नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.