मुंबई – पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मुंबई कोर्टाच्या परिसरातून फरार झालेला दहशतवादी अफझल उस्मानीला एटीएसने नेपाळच्या सीमारेषेवरून अटक केली आहे. उस्मानी हा देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असताना ऐनवेळी एटीएसने मोठ्या शिताफीने त्याला अटक केली आहे. उस्मानी हा सुरत स्फोटातील मुख्य आरोपी आहे. 20 सप्टेंबर रोजी तो मुंबई सेशन्स कोर्टाच्या आवारातून पळाला होता.
दीड महिन्याच्या तपासानंतर अखेर उस्मानीला अटक करण्यात आली. एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी बातमीला दुजोरा दिला आहे. 20 सप्टेंबर रोजी मुंबईच्या सेशन्स कोर्टातून इंडियन मुजाहिदीनचा अतिरेकी अफझल उस्मानी पोलिसांच्या तावडीतून पळाला होता. सुरत बॉम्बस्फोट प्रकरणी अफझल उस्मानीला कोर्टात हजर करतेवेळी पोलिसांच्या तावडीतून तो पळाला होता. उस्मानीचा शोध घेण्यासाठी 20 टीम मागावर होत्या.
उस्मानी कोर्टातून पळाल्यानंतर मुंबईतील धारावी झोपडपट्टीत त्याच्या बहिणीकडे जाऊन लपला होता. आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून त्यांने दाढी मिशा काढून वेशांतर केले होते. काही दिवस आपल्या बहिणीकडे राहिल्यानंतर तो बोरिवली येथे गेला तिथून त्यांने बसने सुरत गाठले. सुरतला गेल्यानंतर तो इंदोरला गेला. उस्मानी प्रत्येक वेळा आपली ठिकाण बदलत होता. भारत सोडून जाण्याच्या तयारीत तो नेपाळ आणि भारतच्या सीमारेषेवर रुपयदिना रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता. रेल्वे रुळ ओलांडत असताना एटीएसच्या अधिकार्यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला लखनौ येथे आणण्यात आले. त्याची चौकशी केल्यानंतर रविवारी रात्री त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.