कुटुंबनियोजनाच्या योजनेलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आव्हान

कोची – हम दो हमारा एक … कुटुंबनियोजनाच्या योजनेलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आव्हान दिले आहे. छोटं कुटुंब ठेवण्याच्या योजनेचे अंध अनुकरण करत राहिले तर हिंदू कुटुंबे नामशेष होतील, असा धोका आरएसएसने तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपानिमित्ताने कोची येथे व्यक्त केला आहे.

कॅथलिक कुटुंबांत अधिक मुलांना जन्म देणार्‍या कुटुंबांना चर्चकडून बक्षीस देण्यात येते, या मोहिमेचा दाखला देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदूंनाही कुटुंबविस्ताराचा सल्ला दिला आहे. मुलांची संख्या मर्यादित न ठेवता मोठ्या कुटुंबाचा नारा दिला आहे. कुटुंब छोटे ठेवण्यासाठी नियोजनाचे अंध अनुकरण करीत राहिले, तर हिंदू कुटुंबे नामशेष होण्याचा धोका आहे, असा इशाराही यावेळी दिला. यावर उपाय म्हणजे हिंदू कुटुंबांचा संख्यात्मक आकार वाढवणे, अशी संघाची ठाम धारणा यावेळी व्यक्त केली गेली.

हिंदू कुटुंबात आता एका मुलावर समाधान मानण्याचा कल वाढला असून, त्यामुळे हिंदूंच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याचे संघाचे म्हणणे आहे. 2011 च्या जनगणनेनुसार हिंदूंमध्ये सहा वर्षांपर्यंतच्या मुलांचे प्रमाण 15 टक्के तर मुस्लिमांमध्ये 18 टक्के आहे. त्यामुळे हम दो हमारा एकफ ऐवजी हम दो हमारे तीनफ ही योजना हिंदू कुटुंबांनी अंमलबजावणी करावी, असे संघाचे संयुक्त सचिव दत्तात्रय होसबळ यांनी म्हटले आहे. मात्र, आरएसएसफच्या या घोषणांवर सर्व स्थरांतून टीका करण्यात येत आहे.