जल नियोजनात टोकाचा विचार नको

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल औरंगाबादेत दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात बोलताना लहान पाटबंधारे प्रकल्पांची मोठीच तरङ्गदारी केली आणि मोठ्या धरणांपेक्षा लहान धरणेच उपयुक्त ठरतात असे प्रतिपादन केले. कै.वसंतराव नाईक यांनी लहान बंधार्‍यांचाच प्रयोग केला होता. पण आपण त्या मार्गावरून विचलित झालो असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंंत्र्यासारखी अधिकारी व्यक्ती असे प्रतिपादन करते तेव्हा साहजिकच त्यातून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असते आणि महाराष्ट्रात तर लहान धरणे विरुध्द मोठी धरणे असा सनातन वाद आहे. सध्या मुख्यमंत्री लहान प्रकल्पांच्या प्रभावाखाली आहेत. त्यांनी गतवर्षी छोट्या प्रकल्पांचा आणि सिमेंट बंधार्‍यांचा आग्रह धरायला सुरूवात केली. धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे करण्यात आलेला शिरपूर बंधार्‍याचा प्रयोग मुख्यमंत्र्यांना ङ्गारच भावला आणि त्यांनी तिथे एकदिवस मुक्काम करून या बंधार्‍यांचा अभ्यास केला. त्यांनी त्यातून धडा घेऊन महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये शिरपूर बंधार्‍यांची उभारणी सुरू केली आहे. गतवर्षी मुख्यमंत्र्यांना हा साक्षात्कार थोडा उशिरा झाला. पण यंदा त्यांनी आधीच छोट्या बंधार्‍यांची अनेक कामे हाती घ्यावीत आणि त्यातून महाराष्ट्रातल्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्‍न कायमचा मार्गी लावावा अशी अपेक्षा आहे आणि त्यांचा एकंदर स्वभाव आणि तत्परता पाहता ते हे काम करतील अशी आशा आहे.

औरंगाबादेत भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी छोट्या बंधार्‍यांचा विचार आग्रहाने मांडला ही गोष्ट खरी. परंतु छोटे बंधारे उपयुक्त ठरतात याचा अर्थ मोठे बंधारे उभे करू नयेत असा होत नाही. शेवटी धरण किंवा पाटबंधारे प्रकल्प हा छोटा असावा की मोठा असावा हे त्या प्रकल्पाच्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीर तसेच जलस्त्रोताच्या स्वरूपावर अवलंबून असते. ब्रह्मपुत्रा नदीवर छोट्या धरणाचां विचार मांडणे अनुचित ठरेल. कारण या नदीचे पात्र पाच किलोमीटर रुंदीचे आहे. तिथे लहान धरण बांधणार कसे ? भारतामध्ये नर्मदा नदीवर सरदार सरोवर हा प्रचंड प्रकल्प उभारताना लहान प्रकल्प विरुध्द मोठी धरणे असा ङ्गार मोठा वाद झालेला आहे. त्यातून असे निष्पन्न झाले की, धरणे लहान असावीत की मोठी असावीत यांच्याबाबतीत कोणताच टोकाचा निर्णय घेता येत नाही. ज्या ठिकाणी लहान बंधारे उपयुक्त असतील तिथे ती लहानच उभारली पाहिजेत. हे बरोबरच आहे आणि मोठ्या धरणांचे अनेक दुष्परिणामही आहेत. हेही नाकारता येत नाही. विशेषतः अलिकडच्या काळात या गोष्टी ङ्गार प्रकर्षाने पुढे येत आहेत.

काही लोकांना मोठ्या धरणांच्या कल्पनेने एवढे झपाटून टाकलेले असते की त्यापोटी त्या धरणांच्या दुष्परिणांकडे ते लक्ष देत नाहीत. मोठी धरणे उभारली जातात तेव्हा सुरूवातीच्या काळात तरी पाण्याच्या संबंधात मोठे आशादायी चित्र निर्माण केले जाते. प्रत्येक मोठ्या धरणांच्या बाबतीत हे घडलेले आहे. धरणाचा पायाभरणी समारंभ किंवा पाणी अडवण्याचा कार्यक्रम असा काही उत्सव सुरू झाला की मंत्र्यांच्या रसनेला बहार येतो आणि हे लोक आपल्या भाषणातून शेतकर्‍यांच्या मनात हिरवे स्वप्न जागे करतात. अशावेळी अभियंते मंडळीसुध्दा पाण्याच्या मापाची गणिते मांडतात. भिजणार्‍या जमिनीचे काहीसे अतिशयोक्त आकडे मांडून लोकांना खुष करतात. पण प्रत्यक्षात धरण उभे राहते. पाणी अडवले जाते आणि ते सरळ शेतापर्यंत येतच नाही. तेव्हा सारी गणिते चुकल्याचे लक्षात येते. सध्या महाराष्ट्रात जायकवाडी धरणाचा प्रश्‍न असाच गाजत आहे. कारण धरणाची उभारणी करताना केलेला या प्रकल्पाच्या पाण्याच्या हिशोब निदान मराठवाड्यापुरता तरी पूर्ण चुकलेला आहे. गोदावरी नदीचे पाणी जायकवाडी धरणात किती मोठ्या प्रमाणात येईल आणि जायकवाडी हे धरण मराठवाड्यासाठी वरदान ठरेल याचे सुरूवातीच्या काळात उभे केलेले चित्र पूर्णपणे ङ्गसले आहे.

धरण उभारणी करताना धरणाखाली गेलेली जमीन आणि धरण पूर्ण झाल्यानंतर भिजणारी जमीन यांचे गुणोत्तर सांगितले गेले होते. एक हेक्टर जमीन धरणाखाली गेल्यास कमीत कमी ३ हेक्टर आणि जास्तीत जास्त ४ हेक्टर जमीन बागायत होईल असे म्हटले गेले होते. पण प्रत्यक्षातला अनुभव असा आहे की धरणाखाली जेवढी जमीन गेली तेवढीच जमीन बागायत झाली आहे. पुढच्या काळामध्ये शहरांनी पिण्यासाठी पाणी मागितले आणि उरलेले पाणी उद्योगाकडे वळविले तर एवढीसुध्दा जमीन भिजणार नाही. मात्र हे नकारार्थी चित्र उभे केले जात असतानाच आपल्याला मोठ्या धरणांच्या काही ङ्गायद्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पाणी कशासाठीही वापरले तरी एवढा मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता मोठ्या धरणातच असते आणि मोठ्या धरणामुळेच वीजनिर्मिती शक्य होत असते. सिमेंट बंधारे आणि शिरपूर बंधारे त्या त्या भागापुरते उपयुक्त असतील परंतु त्यांचा वीज निर्मितीला काहीच ङ्गायदा होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून छोट्या आणि मोठ्या बंधार्‍यांच्या वादात तारतम्याने मध्यम मार्ग काढणेच योग्य ठरते.