मोदींच्या जीवाला धोका – यापूर्वीच दिला होता इशारा

नवी दिल्ली – बिहारमध्ये भाजप च्या हुंकार रॅलीदरम्यान झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाबाबत गुप्तवार्ता विभागाकडून कोणताही धोक्याचा इशारा मिळाला नव्हता असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जाहीर केले असले तरी गुप्तवार्ता विभागाने मात्र असा धोका असल्याचा इशारा बिहारसह सर्वच राज्यांना २४ सप्टेंबर रोजीच दिला गेला होता असा खुलासा केला आहे.

यासंबंधी गुप्तवार्ता विभागातील खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदींना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यापासूनच अनेक दहशतवादी संघटना, इस्लामिस्ट दहशतवादी इतकेच नव्हे तर मोदींचे राजकीय शत्रूंही त्यांना टार्गेट करण्याच्या मागे आहेत. मोदींना असलेला धोका ए प्लस म्हणजेच अतिसावधानता या कॅटॅगरीतील असून देशभर सर्वच ठिकाणी त्यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. यामुळे मोदी देशात ज्या ज्या राज्यांना भेटी देणार आहेत, त्या सर्व राज्य सरकारांना गुप्तवार्ता विभागाने यापूर्वीच सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यासंबंधीचा इशारा दिला आहे. या संदर्भात २४ सप्टेंबरला पुन्हा एकदा ताजा इशारा ही दिला गेला होता.

या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, केरळ, तमीळनाडू या राज्यांकडून त्यासंदर्भात गुप्तवार्ता विभागाला प्रतिसादही मिळाला आहे. त्रिची पोलिसांनी तर यासंदर्भात बैठक घेऊन मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहणार नाहीत असा निर्णयही घेतला आहे. गुप्तवार्ता विभागाने इशारा दिल्यानंतर त्यापुढची जबाबदारी स्थानिक पोलिस आणि प्रशासनाची असते असे सांगून हे अधिकारी म्हणाले की मोदींसंदर्भात जी जी संभाषणे केली जात आहेत त्याचे ट्रॅकिंगही केले जात आहे व त्यात इस्लामिस्ट अतिरेक्यांबरोबरच अनेक दहशतवादी संघटना व मोदींचे राजकीय शत्रू यांचा समावेश आहे. राजकीय शत्रू खोट्या नावाने संघटना काढून मोदींच्या जीवाला धोका देण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.