नवी दिल्ली – दिवाळीच्या हंगामात सोन्याच्या किंमती प्रचंड वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोन्याची खरेदी प्रामुख्याने ग्रामीण भागातून केली जाते आणि यंदा पाऊसपाणी चांगले झाल्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांच्या हातात चांगला पैसा आला आहे. परिणामी सोन्याची मागणी वाढणार आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या भावात तेजी आलेली आहे आणि भारत सरकारच्या धोरणामुळे आवक कमी झालेली आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम होऊन दिवाळीच्या हंगामात म्हणजे धनत्रयोदशी दिवशी सोन्याचा भाव १० ग्रॅमला ३३ हजार रुपये असा होण्याची शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.
यावर्षी धनत्रयोदशी १ नोव्हेंबरला आलेली आहे. त्याच्या आतच सोन्याचा भाव मुंबईमध्ये १० ग्रॅमला ३१ हजार ७०० आणि दिल्लीमध्ये ३२ हजार ५७० रुपये असा झालेला आहे. २८ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या मार्केटमध्ये सोने ३४ हजार ५०० रुपये अशा भावाने विकले गेले होते. त्यामुळे ३३ हजारचा भाव होणे हे अशक्य नाही.
भारतात सोन्याची आयात होऊ नये यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. त्यामुळे सोन्याच्या आवकीवर परिणाम झाला आहे. चालू वर्षीच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या तिमाहीत भारतात ३३५ टन सोने आयात झाले होते. ही आयात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ८० टक्क्यांनी कमी झाली आणि या तीन महिन्यात केवळ ५९ टन सोने आयात केले गेले. त्यामुळे बाजारात सोन्याची चणचण जाणवत आहे आणि मागणी तर वाढत आहे. त्यामुळे प्रचंड दरवाढ अटळ आणि अपरिहार्य आहे.