पाकला दिले 26/11 हल्ल्याचे पुरावे

नवी दिल्ली- 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानमधील लष्कर ए तोयब्बाचा म्होरक्या झकिउर रेहमान लखवी याच्यासह सात मुख्य आरोपींविरोधात खटला चालवण्यासाठी पाच महत्त्वाचे पुरावे भारताने पाकिस्तानकडे सुपूर्द केले आहेत.

मुंबई हल्ल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची सत्यप्रत, ठार झालेल्या नऊ दहशतवाद्यांचे शवविच्छेदन करणा-या दोन डॉक्टरांचे शपथपत्र आणि या प्रकरणाची चौकशी करणा-या मुख्य चौकशी अधिका-यांचे निवेदन आदींची माहिती या कागदपत्रांमध्ये देण्यात आली.

या हल्ल्याचे नियोजन, दहशतवाद्यांना मिळालेले प्रशिक्षण तसेच हल्ल्यासाठीचे अर्थसहाय्य पाकिस्तानमधूनच दिले गेले. त्यामुळे या हल्ल्यासंदर्भातील 99 टक्के पुरावे पाकिस्तानातच मिळेल, असे भारताकडून सांगण्यात आले होते. मात्र यासंदर्भात आणखी पुराव्याची मागणी पकिस्तानकडून करण्यात आली होती.

भारताकडून देण्यात आलेले कागदपत्रे ही वैध असून त्याची पुनर्परीक्षण पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाने केले आहे. ही कागदपत्रे पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना 15 ऑक्टोबर रोजी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.