आंतरराष्ट्रीय स्तरावर महासत्ता झाली बदनाम

वॉशिंग्टन – ओबामा केअर विधेयकामुळे झालेली आर्थिक नाचक्की आणि कामकाज थांबवण्याच्या संकटातून मुक्त झाल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना स्वस्थ बसता आलेले नाही. कारण राष्ट्रीय सुरक्षिततेच्या नावाखाली राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून (एसएसए) करण्यात आलेल्या हेरगिरीचे भूत आता त्यांच्या मानगुटीवर एवढे घट्ट बसले आहे की, त्याबद्दलचे स्पष्टीकरण देता-देता आणि दिलगिरी व्यक्त करताना नाकीनऊ आलेले आहेत.

एसएसएचा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन याने अमेरिकेचा लाजिरवाणे कृष्णकृत्य जगासमोर उघड केले तेव्हाही या विषयाचे गांभीर्य लक्षात घेतले गेले नाही. मात्र आता त्याचे फटके अमेरिकेला आणि अमेरिकेच्या नेत्यांना चांगलेच जाणवायले लागले आहेत. जर्मनीच्या चॅन्सलर आणि अमेरिकेच्या विश्वासू साथीदार असलेल्या अँजेला मर्केल यांच्यासह जगातील 35 नेत्यांवर पाळत ठेवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जगभरातून अमेरिकेकडे नाराजी, राग आणि खेद व्यक्त करण्यात यायला सुरुवात झाली आहे.

मागच्या दोन दिवसांपासून राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि परराष्ट्रमंत्री जॉन केरी हे आपल्या मित्र राष्ट्रांकडे दिलगिरी व्यक्त करण्यात गुंतले आहेत. अमेरिकेच्या ज्या गुप्तहेर खात्याबद्दल अमेरिका छातीठोकपणे अभिमान व्यक्त करत असते त्या गुप्तचर यंत्रणेचा कारभार आज अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची गणिते बदण्यास कारणीभूत ठरला आहे.

जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यासह फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री बर्नाड कौचनर, ब्रिटीश राजदूत टॉन फ्लेचर यांनीही अमेरिकेच्या या हेरगिरीमुळे आपल्याला धक्का बसल्याचे स्पष्ट केले आहे. स्नोडेनने जेव्हा अमेरिकेचा अत्यंतिक गोपनीय असा प्रिझ्म हा कार्यक्रम जगासमोर उघड केला तेव्हा रशिया, चीनसारख्या अमेरिकेच्या स्पर्धक राष्ट्रांना अमेरिकेवर टीका करण्याची ही आयतीच संधी चालून आली.

जगभरात मानवीहक्कांच्या नावाने ओरड करणारी अमेरिका स्वतःच आंतरराष्ट्रीय मानवी समुदायाच्या मानवीहक्कांचा गळा घोटते आहे, असा प्रचार या राष्ट्रांनी केला तर फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून जगभरातील तरुणाईसमोर अमेरिकेची प्रचंड बदनामीकारक चर्चा झडायला सुरुवात झाली. मात्र ज्या मित्रांच्या जोरावर अमेरिका आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्या निर्णयांची एकाधिकारशाही गाजवत असते, त्या मित्रांचाही अमेरिकेने विश्वासघात केल्यानंतरही आता जगभरातून त्यांना या कृत्याचा जाब विचारण्यास सुरुवात झाली आहे. जर्मनी, मेक्सिको, ब्राझिल या मित्रांनीही ओबामांकडे स्पष्टीकरण मागितले आहे.