एअर इंडियाचे खासगीकरण झाल्यास आनंद – रतन टाटा

नवी दिल्ली – एअर इंडियाचे खासगीकरण झाले तर आपल्याला आनंदच होईल अशी भावना टाटा ग्रूपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी  पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. यावेळी सिंगापूर एअरलाईन्सचे सीइओ गो चून फाँग आणि आणि टाटा एसआयए चे अध्यक्ष प्रसाद मेनन उपस्थित होते.

टाटा सन्स उद्योगाचा एक भाग म्हणून एअर इंडियाची स्थापना झाली होती आणि १९४६ पर्यंत टाटा एअरलाइन्स या नावाने ही कंपनी चालविली जात होती. त्यानंतर ती सार्वजनिक क्षेत्रातील लिमिटेड कंपनी बनली. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अजितसिंग यांनी कांही दिवसांपूर्वीच विमान आणि हॉटेल्स यासारख्या सेवा क्षेत्रात सरकार असू नये असे वैयक्तीक मत व्यक्त केले होते. त्या पार्श्वभूमीवर टाटा यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. अजित सिंग यांनी भविष्यात एअर इंडियासाठी सरकार जादा फंडस देऊ शकणार नाही असेही सूचित केले होते.