आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस; 17 बळी

हैदराबाद- मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेशात 17 जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. सतत कोसळणा-या मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेशात शुक्रवारी चौथ्या दिवशीही जनजीवन विस्कळीत झाले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागात ईशान्य पावसाने मंगळवार रात्रीपासून जोरदार पावसाने झोडपून काढले. शेकडो घरांची पडझड झाली आहे. तर हजारो लोकांना सुरक्षित स्थळावर तात्पूरत्या शिबीरात हलवण्यात आले आहे. आंध्र सरकारने किनारपट्टी भागात सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

धरणे ओसंडून वाहत आहेत. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सतत पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याचे गंटूरचे जिल्हाधिकारी एस. सुरेश कुमार यांनी सांगितले. गुंटूर जिल्ह्यात 36 शिबीर उभारली आहेत. येथे 11 हजार लोकांना स्थलातरीत केले आहे. तर सुरक्षेचा उपाय म्हणून श्रीकाकुलम जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील 45 हजार लोकांना शिबीरात हलवण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक तिथे वेळेवर मदत पोहचवण्यासाठी अतिदक्षतेचा इशारा दिल्यानंतर मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जमिनीवरील पिके पाण्याखाली बुडाल्याने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे. आणखी 48 तास मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.