वॉशिंग्टन – एडवर्ड स्नोडेन याने अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील हेरगिरीचा वृत्तांत जगासमोर उघड केला आणि जगभरातून अमेरिकेच्या उदारमतवादी भूमिकेबद्दल साशंकता निर्माण झाली. जगातील प्रत्येकाच्या अभिव्यक्तीचा हक्क राखण्यासाठी प्रयत्न करणा-या अमेरिकेनेच जगातील नागरिकांच्या अभिव्यक्तीवर घाला घातल्याची भावना व्यक्त व्हायला लागली आणि या सर्व प्रकरणामुळे अमेरिकन सरकारला मान खाली घालावी लागली आहे.
ज्या मित्र राष्ट्रांच्या पाठिंब्यावर आजवर अमेरिकेने आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रभाव निर्माण केला त्या मित्रांसोबतचे संबंध आणि त्यांना अमेरिकेबद्दल वाटणारा विश्वास या गोष्टींना आता या हेरगिरीमुळे तडा गेला आहे. या सर्व पाश्वभूमीवर सौख्याचे संबंध असलेल्या जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांचे मोबाईल संभाषण टॅप केल्याचा आरोप अमेरिकेसाठी मोठाच त्रासदायक होणार आहे.
अमेरिकेच्या प्रिझ्म या हेरगिरीसाठी अंमलात आणण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोपनीय मोहिमेबाबतचा धुरळा अद्याप उडालेला नसून आता आपल्या चॅन्सलर अंजेला मर्केल यांच्या मोबाईल संभाषणावर अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने पाळत ठेवला असल्याचा संशय जर्मन सरकारने व्यक्त केला आहे. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी बुधवारी फोनवरून राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांकडे स्पष्ट शब्दांत या हेरगिरीबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आपल्या मित्रराष्ट्रांमधील व्यक्तींच्या संभाषणावर पाळत ठेवणे अस्वीकारार्ह आहेच मात्र त्यापेक्षा हा प्रकार अत्यंतिक किळसवाणा आहे त्यामुळे विश्वासाहर्ता संपुष्टात येते. यावर ओबामा यांनी मर्केल यांना यापुढे अमेरिकन गुप्तचर संस्था त्यांच्या संभाषणावर पाळत ठेवणार नाहीत, असे आश्वासन दिले. मात्र आजवर ठेवलेल्या पाळतीबाबत उत्तर देणे त्यांनी टाळले.
याच आठवड्यात ओबामा यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅन्कॉइस हॉलंद यांना फोन केला होता त्या वेळी हॉलंद यांनी त्यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून करण्यात आलेल्या (एनएसए) लाखो फ्रेंच नागरिकांच्या मोबाईल संभाषणाच्या रेकॉर्डिंग्ज आणि एसएमएसवरील पाळतीबद्दल तिव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. त्यापूर्वीच ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष दिल्मा रौसेफ, मेक्सिकोच्या इन्रीक पेना नायटो यांनीसुद्धा या हेरगिरीच्या प्रकरणामुळे अमेरिकेचे परराष्ट्रसंबंध बिघडणार असल्याचे स्पष्ट केले होते.