किशोरदांच्या गाण्यावर थिरकली प्रिन्स चार्लस व कॅमिलाची पाऊले

लंडन – ब्रिटनच्या सेंट जेम्स र्पलेसमध्ये प्रिन्स चार्लस व त्यांची पत्नी कॅमिला यांनी आयोजित केलेल्या विशेष स्वागत समारंभात किशोरदांच्या ‘ ओ मेरे दिल के चैन ‘ या गाण्याचे सूर ब्रिटीश इंडियन गायक नवीन कुंद्रा याने आळविले आणि त्याच क्षणी प्रिन्स चार्लस व कॅमिला यांनी या गाण्यावर टाळ्या वाजवून पायाने ठेका धरल्याचे उपस्थितांना पाहायला मिळाले. तेरे लिए आणि मेहबूबा ओ  मेहबूबा या त्या पाठोपाठ म्हटल्या गेलेल्या गाण्यांनीही चार्लस आणि कॅमिला एकदम खूष झाले.

पुढील महिन्यात दक्षिण आशियाच्या दौर्‍यावर येत असलेल्या या राजेशाही जोडप्याने त्या निमित्ताने ब्रिटीश इंडियन व श्रीलंकन कम्युनिटीसाठी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. त्याला उद्योग व्यवसाय, राजकारण, मनोरंजन, चॅरिटी क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती.  गायक नवीन कुंद्रा याने या समारंभात गाण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच प्रिन्स चार्लस यांना मेहबूबा हा शब्द तुम्ही कॅमिलासाठी सदासर्वकाळ वापरू शकता असेही सांगितले.

प्रिन्स चार्लस व कॅमिला ६ ते १४ नोव्हेंबर दरम्यान भारत भेटीवर येणार असून भारताला त्यांची ही तिसरी भेट आहे. या भेटीत ते डेहराडून, मुंबई, दिल्ली, पुणे व कोची या शहरांना भेट देणार आहेत. या भेटीत ते राजकीय व्यक्ती, उद्योजक, सांस्कृतिक नेते व व्यावसायिकांनाही भेटणार आहेत. मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटीसह ते शाही खानाही घेणार आहेत असे समजते. त्यानंतर ते श्रीलंकेला जाणार आहेत.