तनिषाने माजविले ‘बिग बॉस’मध्ये रणकंदन

बॉलीवूड मधील प्रसिध्द अभिनेत्री काजोलची बहीण म्हणून तनिषाला ‘बिग बॉस’च्या घरात जास्त मान होता. सुरुवातीला ‘बिग बॉस’च्या घरात शांतपणे वावरणारी तनिषा काजोलप्रमाणेच समजूतदार आहे अशी इतर सदस्यांची खात्री झाली होती. गेल्या काही दिवसांतील तिचे वर्तन इतर सदस्यांना चक्रावून टाकणारे होते. मात्र, मंगळवारी मध्यरात्री ‘बिग बॉस’च्या घरात माजविलेल्याा रणकंदनामुळे तनिषाचे खरे रूप सर्वांसमोर उघडे पडले आहे.

‘बिग बॉस’च्या घरात गेल्याेपसून तनिषाचे अरमान कोहलीबरोबर चांगलेच सूर जुळले आहे. मात्र, त्यानंतर इतरांना तुच्छ लेखणे, एकमेकांमध्ये भांडणे लावणे, आपण सर्वापेक्षा किती ग्रेट आहोत याचा सतत टेंभा मिरवणे या प्रकारामुळे तिच्याबद्दल घरातील इतर सदस्यांचे मत आधीच दूषित झाली आहेत. त्यात कुशाल आणि तनिषामध्ये इतके जोरदार भांडण झाले की ते दोघेही कोणाला आवरत नव्हते. कुशालने तनिषाचे दावे किती खोटे आहेत हे सांगायला सुरुवात केली. त्याने घरातल्या सर्वासमोर तिची काजोलबरोबर तुलना सुरू केली. काजोल किती यशस्वी अभिनेत्री आहे आणि तरीही तिने आपल्या कुटुंबाला कसे सांभाळले आहे. त्याउलट, तनिषा एक सुपरफ्लॉप अभिनेत्री आहे, अशी बडबड कुशालने सुरू करताच त्या दोघांमधले भांडण मारामारीपर्यंत पोहोचले. झाल्या प्रकारामुळे चिडलेल्या कुशालने ‘बिग बॉस’ला मला कृपा करून इथून बाहेर काढा, अशी विनवणी केली. त्याला कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्याने सरळ ‘बिग बॉस’च्या घराचे कुंपण ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पुन्हा घरात परतावे लागले, असे सूत्रांनी सांगितले.

या भांडणामुळे कुशालला नियम तोडल्याबद्दल ‘बिग बॉस’ कडून शिक्षा मिळेलच; पण, तनिषाच्या या बेबंद वर्तनामुळे तिचे कुटुंबीयही चांगलेच अडचणीत आले आहे. तनिषाने बिग बॉसमध्ये सहभागी होऊ नये, यासाठी तनुजा आणि काजोल दोघींनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वीच देवगण कुटुंबियांनी तनिषा आणि अरमानच्या जवळीकीचे चित्रिकरण दाखवू नका, अशी विनंती वाहिनीला केली असल्याणचेही समजते.