श्रीनगर – गेल्या दोन महिन्यांपासून दररोज पाकिस्तानी फौजा आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडून भारतीय हद्दीतील बीएसएफ चौक्यांवर गोळीबार करत आहेत. रात्री करण्यात आलेल्या गोळीबारात एक बीएसएफ जवान शहीद झाला. काल रात्री पाकिस्तानी रेंजर्सने तब्बल 15 बीएसएफ चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. रात्री शहीद झालेला बीएसएफ जवान आर एस पुरा सेक्टरमधील सीमेवरील चौकीवर तैनात असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आले.
काल केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जम्मू-काश्मीर दौरा करून पाकिस्तानकडून सातत्याने सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची माहिती घेतली होती. सुशील कुमार शिंदे यांनी पाकिस्तानच्या कुरापती घुसखोरीचा प्रोत्साहन देण्यासाठीच असल्याचा आरोप करत सीमेपलीकडे हाफीज सईद असल्याचाही दावा केला होता. त्यानंतरही पाकिस्तानी सैन्याने आपल्या कुरापती थांबवलेल्या नाहीत.
या एका वर्षात फक्त पाकिस्तानने 200 पेक्षा जास्त वेळा सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे आवाहन बीएसएफने आपल्या जवानांना केले आहे. सोमवारीच जम्मू – काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारकडे पाकिस्तानी आगळिकीला चोख उत्तर देण्याची मागणी केली होती. पाकिस्तानला शांतता चर्चेची आणि शब्दांची भाषा कळत नाही, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. पाकिस्तानला कळणार्या भाषेतच त्यांना उत्तर द्यायला पाहिजे, असंही आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले होते.