नालंदासारख्या प्राचीन सभ्यतेचे अवशेष मिळतील- ओमबाबा

उन्नाव- उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातल्या डौडिया खेडामध्ये शहीद राजा राव रामबक्श सिंह यांच्या किल्ल्यात १००० टन सोने मिळण्याचा दावा केला होता. त्यामुळे याठिकाणी उत्खननाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यातच आता ओमबाबने पुन्हा एक नवा दावा केला आहे. शोभन सरकारचे शिष्य ओमबाबा यांनी या खोदकामात नालंदासारख्या प्राचीन सभ्यतेसारखे अवशेष मिळतील असे संगितले आहे. त्यामुळे सर्वांचेच आता या खोदकामांकडे लक्ष लागले आहे.

यावेळी दावा करताना ओमबाबा म्हणाले, ‘खोदकाम १८ फूटपर्यंत पोहोचण्याची वाट पाहा, त्यानंतर नालंदासारख्या प्राचीन सभ्यतेचे अवशेष मिळतील.’ किल्ल्यात सोन्याचा खजिना दडलेला असल्याच्या आपल्या दाव्याबद्दल ओमबाबा म्हणाले, की पंतप्रधान आपल्या कर्मचा-यासह येथे आल्यास खजिना बाहेर काढून दाखविन असा दावाही ओमजी यांनी केला आहे.

दरम्यान बिघापूरचे तालुक्याचे उपजिल्हाधिकारी विजय शंकर दुबे म्हणाले, ‘खोदकामाच्या पाचव्या दिवशी मातीचे भांडे, फुटलेल्या लाखेच्या बांगड्या मिळाल्या. पाच दिवसांच्या खोदकाम १९२ सेंटीमीटरपर्यंत पोहोचले आहे. तर बुधवारी एएसआयची टीम आज सुट्टीवर असेल, त्यामुळे खोदकाम बंद असणार आहे.’