भोपाळ – मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणूक होत असलेल्या २३० जागांपैकी २१ जागांवरच्या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या असून या मतदारसंघातले गेल्या निवडणुकीचे निकाल अगदी काठावरच्या बहुमताने लागले आहेत. यावेळी काही शे मतदानाच्या ङ्गरकाने सुद्धा इथले निकाल बदलू शकतात अशी शक्यता आहे. त्यामुळे या २१ जागांवरच्या अटीतटीच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक २५ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात होत आहे.
२००८ सालच्या विधानसभा निवडणुकीत धार विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या नीना वर्मा या केवळ एका मताने निवडून आल्या होत्या. नीना वर्मा या भाजपाचे खासदार विक्रम वर्मा यांच्या पत्नी आहेत. त्यांनी कॉंग्रेसचे बालमुकुंद गौतम यांचा एका मताने पराभव केला होता. त्यानंतर गौतम यांनी न्यायालयात धाव घेतली आणि अनेक प्रकारच्या हरकती उपस्थित केल्या. प्रदीर्घ काळ चाललेली न्यायालयीन लढाई त्यांच्या बाजूने जिंकली गेली आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
मध्य प्रदेशाचे मंत्री झालेले जयंत मलैया यांनी दमोह मतदारसंघात कॉंग्रेसचे चंद्रभान यांना केवळ १३० मतांनी पराभूत केले होते तर कॉंग्रेसचे सज्जनसिंग वर्मा यांनी सोनकछ मतदारसंघात भाजपाच्या ङ्गुलचंद वर्मा यांना १९१ मतांनी पराभूत केले. नंतर सज्जनसिंग वर्मा हे खासदार झाले. असाच प्रकार छिंदवडा जिल्ह्याच्या जुन्नारदेव मतदारसंघात घडला होता. तिथे कॉंग्रेसच्या तेजील सरियन यांनी भाजपाच्या नाथनसिंग कावरेटी यांचा १९४ मतांनी पराभव केला होता.
भाजपाचे माजी मुख्यमंत्री कैलास जोशी यांचे चिरंजीव दीपक जोशी हे हाटपिपलीया या मतदारसंघातून २२० मतांनी तर शिवपुरी जिल्ह्यातल्या कोलारास मतदारसंघात भाजपाचेच देवेंद्र जैन हे २३९ मतांनी विजयी झाले होते. अशाच रितीने इंदोर-३, दिन्नी, सिरमौर, पन्ना, महेश्वर, जतारा याही मतदार संघातील निवडणुका हजार मतांपेक्षा कमी मतांनी जिंकल्या गेल्या होत्या.