नवी दिल्ली – गेल्या ३० वर्षात भारताच्या विविध राज्यांमध्ये नक्षलवादी उर्ङ्ग माओवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात १२ हजार नागरिक आणि तीन हजार जवान असे १५ हजार लोक मारले गेले असल्याचे केंद्रीय गृहखात्याने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे. याच काळात सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या गोळीबारात आणि नक्षलविरोधी कारवाईत ४,६३८ नक्षलवाद मारले गेले असल्याचेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
गृहखात्याने १९८० सालपासूनची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. सर्वाधिक बळी २०१० साली पडले. त्यावर्षी ७२० लोक मारले गेले. हे बळी प्रामुख्याने नऊ नक्षलग्रस्त राज्यातले होते. ती नऊ राज्ये छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, बिहार, प. बंगाल, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश ही आहेत. नक्षलवाद्यांच्या कारवाईत पोलीस किंवा निमलष्करी दलाचे जवान कामी येण्याचे सर्वाधिक प्रमाण २००९ साली होते. त्यावर्षी देशात ३१७ जवान शहीद झाले, अशीही माहिती या पत्रकार देण्यात आली आहे.
२०१२ साली नक्षलवाद्यांनी ३०० नागरिकांना आणि ११४ जवानांना मारले. १९८० साली नक्षलवादी हल्ल्यात एकही जवान मारला गेला नव्हता. चालू वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत १९८ नागरिक आणि ८८ जवान मारले गेले तर ५२ नक्षलवाद्यांना मारण्यात पोलिसांना यश आले.