सरकार कांदा आयात करणार

नवी दिल्ली – नवी दिल्लीच्या किरकोळ बाजारात काल कांद्याचा दर ९० रुपये प्रती किलो असा झाला. त्यामुळे सरकारने आता कांदा आयात करण्याचा विचार सुरू केला आहे. लवकरच ही आयात होऊ शकेल, असे प्रतिपादन केंद्रीय व्यापार मंत्री आनंद शर्मा यांनी काल दिल्लीत बोलताना केले. एका समारंभात उपस्थित राहण्यासाठी ते आले असताना पत्रकारांनी त्यांना कांद्याच्या भावाविषयी प्रश्‍न विचारले, तेव्हा त्यांनी आयातीची शक्यता बोलून दाखवली.

देशात कांद्याचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु कांद्याचे व्यापारी त्याचा साठा करून ठेवत आहेत असा आरोप श्री. आनंद शर्मा यांनी केला. कांदा आयात केल्यानंतर त्याचा परिणाम बाजारभावावर झाल्यास साठेबाज व्यापारी कांदा बाहेर काढतील असे मत त्यांनी व्यक्त केले. राज्य सरकारांनी कांद्याचे साठे करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

येत्या डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून खरीप हंगामातला कांदा बाजारात यायला लागेल आणि मग कांद्याचे भाव उतरतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. काल मात्र दिल्लीच्या मार्केटमध्ये कांदा ९० रुपये प्रती किलो या दराने तर देशाच्या अन्य भागात तो ८० रुपये प्रती किलो दराने विकला गेला. कांद्याच्या भावात गेल्या चार महिन्यात दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.