सुशील कुमार शिंदे करणार सीमावर्ती भागाची पाहणी

जम्मू: पाकिस्तानकडून सतत सुरू असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा आढावा आणि सीमावर्ती भागात पाकिस्तानी फौजांच्या गोळीबारामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे मंगळवारी करणार आहेत. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री शिंदे जम्मू-काश्मीरच्या दौ-यासाठी रवाना झाले असल्याची माहिती सुत्रानी दिली.

सुशील कुमार शिंदे मंगळवारी सकाळीच जम्मूमध्ये दाखल झाले असून आज दिवसभरात आंतरराष्ट्रीय सीमेशेजारील भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेलगतचा भाग हा सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजे बीएसएफच्या अखत्यारीत येतो. बीएसएफ हे केंद्रीय गृहमंत्रालया अंतर्गत येणारं निमलष्करी दल आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी १८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री बीएसएफच्या तब्बल 25 चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये बीएसएफच्या चौक्याचे मोठे नुकसान झाले आहे..

पाकिस्तानी रेंजर्सकडून झालेल्या फायरिंगला बीएसएफने त्याचवेळी चोख प्रत्युत्तरही दिले आहेच, पण द्वीपक्षीय पातळीवर त्याचा निषेधही नोंदवण्यात आला आहे. या दोन महिन्यात पाकिस्तानच्या सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर शेकडोवेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सरकारला शांतता चर्चेची भाषा कळत नसेल तर त्यांना कळणाऱ्या भाषेत उत्तर द्यायला हवं असं जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला सुचवले आहे.

एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सातत्याने होणा-या शस्त्रसंधीच्याम उल्लंघनाला चोख उत्तर देण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार केला पाहिजे, असेही त्यांनी केंद्र सरकारला सुचवले आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा दौरा आणि सीमावर्ती भागातील त्यांची पाहणी याला वेगळेच महत्व आले आहे.