बंगळूर : जगातले सर्वात मोठे आय.टी. केंद्र

बंगळूर – बंगळूरला भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. कारण सिलिकॉन व्हॅली हे अमेरिकेतले माहिती तंत्रज्ञानाचे आणि सॉफ्टवेअर निर्मितीचे सर्वात मोठे केंद्र आहे. परंतु २०२० साली बंगळूर हे माहिती तंत्रज्ञानातले एवढे मोठे केंद्र होणार आहे की, त्याचा सन्मान करण्यासाठी त्याला सिलिकॉन व्हॅलीचे अभिधान लावण्याची गरज पडणार नाही. त्यावर्षी ते माहिती तंत्रज्ञानातले जगातले सर्वात मोठे केंद्र होणार आहे.

त्यावर्षी बंगळूरमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील २० लाख तंत्रज्ञ कार्यरत असतील आणि या उद्योगातून अप्रत्यक्षपणे ६० लाख लोकांना रोजगार मिळालेला असेल. त्यावर्षी बंगळूरमधून केवळ माहिती तंत्रज्ञानातून चार लाख कोटी रुपयांची निर्यात झालेली असेल. ही माहिती कर्नाटक सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव श्रीवत्स कृष्ण यांनी दिली.

सध्या बंगळूरमध्ये माहिती तंत्रज्ञानात नऊ लाख लोकांना थेट रोजगार मिळालेला आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या समृद्धीमुळे २७ लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळालेला आहे. बंगळूरमधून सध्या माहिती तंत्रज्ञानामुळे एक लाख ६५ कोटी रुपयांची निर्यात होत आहे, असे श्रीवस्त कृष्ण यांनी सांगितले.

बंगळूर हे माहिती तंत्रज्ञानातले केवढे मोठे केंद्र आहे याचा अंदाज कदाचित या आकड्यांवरून येणार नाही. हैदराबाद आणि चेन्नई या दक्षिण भारतातल्या दोन शहरांचे नावही या संदर्भात घेतले जाते. परंतु या दोन शहरातील माहिती तंत्रज्ञानाच्या उलाढालीची बेरीज केली तरी ती बंगळूरच्या निम्म्याएवढी सुद्धा होत नाही, असे श्रीवत्स यांनी सांगितले. २२, २३ आणि २४ ऑक्टोबर असे तीन दिवस बंगळूरमध्ये आय.टी. उद्योगाच्या संबंधात एक परिषद बोलाविण्यात येणार आहे. त्या निमित्ताने श्रीवत्स कृष्ण हे बोलत होते.