पाकिस्तान निष्प्रभ

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीङ्ग यांनी अमेरिकेत जाण्याच्या आधीच आपण ओबामा यांना भेटून त्यांना काश्मीरच्या प्रश्‍नात हस्तक्षेप करण्याचे आवाहन करणार आहोत असे म्हटले आहे पण शरीङ्ग यांनी ओबामा यांना प्रत्यक्ष भेटून तसे आवाहन करण्याच्या आतच अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने एक पत्रक काढले असून अमेरिका प्रश्‍नात हस्तक्षेपच काय पण साधी मध्यस्थीही करणार नाही असे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने एकदाचा काश्मीरचा नाद सोडून द्यावा, त्याशिवाय तो देश सुखी होणार नाही. पण त्या देशातल्या जनतेलाही ते कळत नाही आणि नेत्यांनाही वळत नाही. भारताचा सतत द्वेष करणे आणि सतत काश्मीरचे दुखणे जगासमोर मांडणे हाच पाकिस्तानचा धर्म होऊन बसला आहे. भारताशी पाकिस्तानशी लढाई झाली आणि हे दोन देश काही निमित्ताने समोरा समोर आले तर पाकिस्तानला बरबाद करायला भारताच्या लष्कराला ङ्गार तर एक आठवडा लागेल. पण भारताचे धोरण सतत संयमाचे राहिले आहे. पण काश्मीरवर आपला हक्क आहे हे जगासमोर सातत्याने आणण्यासाठी पाकिस्तान सीमेवर सातत्याने कुरापती काढत असते. आता त्या देशाचे पंतप्रधान नवाज शरीङ्ग हे अमेरिकेच्या दौर्‍यावर जात आहेत. या दौर्‍याताही एक खोडी काढण्याची त्यांची योजना आहे.

वाटेत लंडनमध्ये थांबल्यावर त्यांनी अमेरिकेत गेल्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटून काश्मीर प्रश्‍नात अमेरिकेने हस्तक्षेप करावा अशी मागणी करणार असल्याचे तुणतुणे वाजवले. काश्मीरच्या प्रश्‍नावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या विरुध्द अशा प्रकारच्या कारवाया करणे ही पाकिस्तानची सवयच आहे. केवळ आजच नव्हे तर स्वातंत्र्यापासून हजार वेळा तरी संयुक्त राष्ट्र आमसभा किंवा अशाच प्रकारच्या अनेक व्यासपीठांवर पाकिस्तानने काश्मीर प्रश्‍न कायमचा तेवत ठेवला आहे. नवाज शरीङ्ग हे नावाप्रमाणे शरीङ्ग असतील आणि ते सत्तेवर आल्यापासून भारत-पाकिस्तान संबंध सुधारायला लागतील अशी अपेक्षा होती. पण शरीङ्ग पंतप्रधान झाले तरी पाकिस्तानचे शेपूट अजून वाकडेच आहे. प्रत्यक्षात भारताने मात्र काश्मीर हा भारताचा अविभाज्य असल्याचे वारंवार निक्षून सांगितले आहे. पाकिस्तानच्या या खोडीला भारताने उत्तर देताना भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी पाकिस्तानला काश्मीरच्या प्रश्‍नाचा नाद सोडण्याचा सल्ला दिला आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे याचा तर खुर्शीद यांनी पुनरूच्चार केला आहेच पण काश्मीर प्रश्‍नावर अमेरिकेत जाऊन बराक ओबामा यांच्यासमोर गळा काढण्याचा काही उपयोग होणार नाही हेही स्पष्ट केले आहे.

मात्र नवाज शरीङ्ग अमेरिकेत पोहोचायच्या आतच अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने पत्रक प्रसिध्दीस दिलेले असून काश्मीरच्या प्रश्‍नावर अमेरिका कधीही हस्तक्षेप करणार नाही असे सांगून नवाज शरीङ्ग यांना जबरदस्त टोला लगावला आहे. अमेरिकेत जाऊन या प्रश्‍नावर बोंबाबोंब करण्याची मनीषा बाळगणार्‍या नवाज शरीङ्ग यांना अमेरिकेत पोहोचण्याच्या आतच अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने हा रट्टा लगावला आहे. काश्मीरच्या प्रश्‍नावर अमेरिकेचे आजवर जे धोरण होते त्यात कसलाही बदल होणार नाही आणि हा प्रश्‍न सुटावा यासाठी अमेरिका हस्तक्षेप करणार नाही असे परराष्ट्र खात्याने बजावले आहे. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला द्विपक्षीय प्रश्‍न आहे आणि तो त्या दोन देशांनी समोरासमोर बसून सोडवला पाहिजे. असे अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या या निमित्ताने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. याचा अर्थ उघड आहे की शरीङ्ग अमेरिकेत येऊन बराक ओबामा यांना भेटतील तेव्हा ओबामा यांच्यापुढे हा विषय काढूच नये असेच जणू परराष्ट्र खात्याने त्यांना बजावले आहे. त्यांच्या भेटीच्या विषय पत्रिकेतच आता काश्मीर हा विषय नाही हे शरीङ्ग यांना अमेरिकेत जाण्याच्या आतच समजले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात बांगला देशाच्या स्वातंत्र्यावरून १९७२ साली झालेल्या युध्दानंतर भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे अध्यक्ष बेनझीर भुट्टो यांच्यात सिमला येथे बोलणी झाली होती. या दोघांच्या चर्चेतून द्विपक्षीय संबंधामध्ये आलेल्या सगळ्या समस्या सुटल्यात असे नाही. मात्र दोन देशामध्ये असलेले प्रश्‍न तिसर्‍या कोणत्याही देशाच्या हस्तक्षेपाविना, या दोन देशांनी समोरासमोर बसूनच सोडवावेत असे सिमल्यात झालेल्या करारात ठरले होते. काश्मीर हा दोन देशांच्या मधला प्रश्‍न असल्यामुळे सिमला करारानुसार त्या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी दुसर्‍या कोणत्याही मधल्या देशाची मध्यस्थी स्वीकारण्याचा प्रश्‍नच येत नाही. या सार्‍या गोष्टी नवाज शरीङ्ग यांना माहीत आहेत. परंतु भारताच्या खोड्या काढण्याची परंपरा ते जारीच ठेवत आहेत. २००३ साली या दोन देशांदरम्यान झालेली युध्दबंदी आता जवळ जवळ संपुष्टात आल्यात जमा आहे. ही युध्दबंदी मोडून पाकिस्तानने भारतीय हद्दीत गोळीबार करणे ही बाब नित्याची होऊन बसली आहे. ते ओबामापुढे जाऊन काय सांगणार आहेत ?