न्यूयॉर्क – अमेरिकेच्या ङ्गॉर्च्युन या मासिकाने जगातल्या ५० सामर्थ्यशाली उद्योजक महिलांची यादी प्रसिद्ध केली असून त्यात चार भारतीय महिलांचा समावेश झाला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचा या यादीत चौथ्या क्रमांकावर समावेश झाला आहे. मूळ भारतीय असलेल्या पण आता अमेरिकेत स्थायिक झालेल्या पेप्सीको कंपनीच्या चेअरमन इंद्रा नुयी यांचाही या यादीत समावेश आहेच, पण अशा केवळ अमेरिकेतल्या सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत त्यांचा दुसरा क्रमांक आहे.
भारतातल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या अध्यक्षा चित्रा रामकृष्ण यांचा या यादीत सतरावा तर एक्सिस बँकेच्या शिखा शर्मा यांचा बत्तीसावा क्रमांक आहे. या यादीत समाविष्ट झालेल्या पाचव्या भारतीय महिला उद्योजिका म्हणजे नैना लाला किडवाई. त्यांचा बेचाळीसावा क्रमांक आहे. अशा प्रकारे पाच भारतीय महिला जगातल्या ५० सामर्थ्यशाली महिलांमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत.
या यादीमध्ये ब्राझीलच्या पेट्रोब्रास या वीज निर्मिती कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया दास ग्रॅगास यांचा पहिला क्रमांक आहे. त्याशिवाय तुर्कस्तानातील सेबान्सी होल्डिंग्ज् या कंपनीच्या संचालिका गुलेर सेबान्सी यांचा दुसरा क्रमांक आहे. या यादीत तिसरा क्रमांक मिळविणार्या महिला उद्योजिका या ऑस्ट्रेलियातील असून त्या म्हणजे जेल केली या ऑस्ट्रेलियातील वेस्टपॅक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. चौथा क्रमांक चंदा कोचर यांचा आहे.
चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआय बँकेने मोठी प्रगती केली आहे. २०१२ साली या बँकेचा भारतातली चौथ्या क्रमांकाची बँक असा महिमा होता, पण आता ती भारतातली सर्वात मोठी बँक झाली आहे. शिखा शर्मा आणि नैना लाल किडवाई यांचा समावेश या यादीत पूर्वीच झालेला होता. नैना लाल किडवाई यांचा क्रमांक पूर्वी चाळीसावा होता, तो आता बेचाळीसावा झाला आहे. परंतु शिखा शर्मा यांनी सदोतिसाव्या क्रमांकावरून बत्तीसाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चित्रा रामकृष्ण यांचा मात्र या यादीत प्रथमच समावेश झाला आहे.