शिलॉंग – बांगला देशातून भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने दोन राज्यातल्या स्थलांतराला सुद्धा अंतर्गत परवान्यांची अट घालावी, अशी मागणी मेघालयातल्या दहा संघटनांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली आहे. प्रणव मुखर्जी यांचा मेघालय दौरा आज सुरू झाला. तेव्हा शिलॉंग येथे त्यांची भेट घेऊन मेघालयातल्या या संघटनांनी त्यांना निवेदन दिले आणि घुसखोरीच्या संकटाविषयी त्यांना जाणीव दिली.
बांगला देशातले घुसखोरी आसाममध्ये घुसखोरी करतात. तिथे सरकारी कर्मचार्यांना लाच देऊन रेशन कार्ड मिळवतात, मतदार यादीत नावे घुसवतात आणि आसाममध्ये असे बनावट नागरिकत्व मिळवलेले बांगलादेशी लोक मेघालयामध्ये घुसखोरी करतात. त्यांच्याकडे आसाममध्ये मिळवलेले भारताचे बनावट नागरिकत्व असल्यामुळे त्यांना मेघालयात घुसण्यास बंदी घालता येत नाही. पण आसाममधून अशा बांगला देशीयांची मोठी घुसखोरी मेघालयात सुरू आहे.
ईशान्य भारतात मेघालय हे तुलनेने शांत राज्य आहे. परंतु अशा घुसखोरांमुळे या राज्याच्या शांततेला गालबोट लागण्याची शक्यता आहे. हा धोका टाळण्यासाठी आसाममधून येणार्या अशा लोकांना इनर लाईन परमीट देण्याची व्यवस्था करावी. भारताच्या प्रचलित कायद्यांमध्ये तशी तरतूद नाही, परंतु इंग्रजांच्या काळात तशी व्यवस्था होती. ती पुन्हा सुरू करावी म्हणजे इशान्य भारताच्या शांततेला गालबोट लागणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.