नागपूर – बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पिंटू (स्वप्नील) शिर्के हत्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने आठ आरोपीना जन्मठेप सुनावली आहे तर इतर सहा आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्येच 19 जून 2002 रोजी पिंटू शिर्केची निर्घृण हत्या करण्यात आली होती. न्यायालयात सर्वांच्या देखत सराईत गुन्हेगारांच्या टोळीने पिंटू शिर्केला धारदार शस्त्रांनी भोसकून ठार मारण्यात आलं होतं.
19 जून 2002 रोजी दुपारी नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या पिंटू शिर्के हत्याकांडाने कायदा सुव्यवस्था, न्याय व्यवस्था सर्वांनाच जोरदार हादरा दिला होता. त्या दिवशी पिंटू शिर्केला एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी पोलिसांच्या सुरक्षिततेत आणण्यात आलं होतं. मात्र, तेव्हाचे काँग्रेस नगरसेवक विजय मते यांच्यासोबत असलेल्या इतर 16 आरोपींनी पिंटू शिर्के याची हत्या केली. पिंटू शिर्के आणि विजय मते यांच्यात जमिनीचा वाद होता. त्यावरून ही हत्या करण्यात आली होती.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पिंटू शिर्के यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा 7000 चौरस फुटाचा एक प्लॉट होता, त्यावर विजय मते याने अवैध कब्जा केला होता. तो जागा सोडत नाही म्हणून पिंटू शिर्के याने एका साथीदाराच्या मदतीने रघुजीनगर भागात विजय मते यांच्यावर गोळीबार केला. मात्र, विजय मते या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले होते. पुढे याच वादातून पिंटू शिर्केच्या लोकांनी संजय गायकवाडची हत्या केली होती.
19 जून 2002 रोजी याच दोन प्रकरणाच्या सुनावणीसाठी पोलिसांनी पिंटू शिर्के आणि त्याच्या एका साथीदाराला नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आलं होतं. त्यावेळी पूर्ण तयारीनिशी आलेल्या विजय मते आणि त्याच्या सराईत गुन्हेगार साथीदारांनी न्यायालयाच्या सहाव्या मजल्यावर सर्वांच्या देखत पिंटू शिर्केची हत्या केली होती. एकूण 17 आरोपी असलेल्या या प्रकरणात पोलिसांनी 16 आरोपींना अटक केली.
नोव्हेंबर 2011 पासून प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु झाली. आज न्यायालयाने त्या प्रकरणात तत्कालीन काँग्रेस नगरसेवक विजय मते, राजू भद्रे, किरण कैथे, उमेश डहाके, कमलेश निम्बार्ते, अयुब खान पठाण, रितेश गावंडे, आणि दिनेश गायकी अशा आठ जणांना जन्मठेप सुनावली. तर इतर सहा जणांची निर्दोष सुटका केली. पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीचा मृत्यू झाला तर एकाला शेवटपर्यंत पोलीस पकडू शकले नाहीत.
विशेष म्हणजे पिंटू शिर्के याची हत्या गर्दीच्या ठिकाणी न्यायलयात लिफ्टजवळ झाल्याने या प्रकरणात मोठ्या संख्येने प्रत्यक्षदर्शी होते. मात्र, या हत्याकांडात नागपूरचे सराईत गुन्हेगारच आरोपी असल्याने तपासादरम्यान पोलिसाना फारसे साक्षीदार मिळाले नाहीत. सुनावणी दरम्यान एकूण 41 जणांची साक्ष झाली. मात्र बहुतांशी साक्षीदार त्यांच्या जबानीपासून पलटले.
धक्कादायक म्हणजे ज्या पोलिस हवालदाराच्या ताब्यातून पिंटू शिर्केला हिसकावून त्याची हत्या केली होती, तोच या प्रकरणात मुख्य फिर्यादी होता, पण त्यानेही आपली साक्ष बदलली. मात्र, पिंटू शिर्केची आई आणि बहिण हे त्यांच्या साक्षीवर कायम राहिले. त्यामुळेच आज सहा आरोपी सुटल्याचं सरकारी पक्षाला वाटतं. आज या प्रकरणाचा निकाल येत असल्याने आणि त्यामध्ये नागपूरचे डॉन सदृश गुन्हेगार सहभागी असल्याने नागपूर पोलिसांनी न्यायालयाभोवती मोठा बंदोबस्त लावला होता.